बेल्हा : शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात भाऊसाहेब पोपट शिंदे (वय ३४) हे जखमी झाले. ही घटना ४ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.शिंदेवाडी भागातील व्हरूंडी येथील वडमळई येथे ही घटना घडली. भाऊसाहेब शिंदे हे ऊस भरत होते. त्यांच्या पत्नी जवळच्या शेतात खुरपत होत्या. उसाला सोडलेले पाणी शेतात कुठपर्यंत गेले आहे, हे पाहण्यासाठी उसात गेले असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने भाऊसाहेबांवर पाठीमागून जोरदार हल्ला केला. हल्ल्यानंतर ते घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आले. त्यांच्या पत्नीला त्यांना काय झाले आहे, हे समजलेच नाही. फक्त त्यांच्या अंगावर खरचटलेले व रक्त सांडलेल दिसले. त्यांनी जवळच असलेले प्रशांत शिंदे यांना घटनेची माहिती सांगितली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भाऊसाहेब यांना बेल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याच्या मानेला, पोटाला व पाठीला जखमा झाल्या असून, ४ ते ५ टाके पडल्याचे बेल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले.येथे प्रथमोपचार करून आळेफाटा येथे अधिक उपचारांसाठी हलविण्यात आले. या ठिकाणी वन खात्याचे वनपाल व्ही. पी. लोंढे, वनरक्षक वनिता राठोड, वनमजूर जे. जी. भंडलकर यांनी येऊन पंचनामा केला. या भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. या पठार भागावर बिबट्याने मनुष्यावर हल्ला करण्याची ही बहुधा पहिलीच घटना आहे. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
By admin | Updated: July 15, 2014 04:09 IST