पुणे : काही वर्षापूर्वीची घटना, डेक्कन जिमखान्यावरील हातगाड्यावर मिळणाऱ्या आइस्क्रीमजवळ ब-यापैकी गर्दी होती. मध्यरात्र होत आली होती. अशात पोलिसांची गस्तीवरील गाडी येते. गाडी पाहून आईस्क्रीम खाणार्यांची गडबड उडाते. तेव्हा तो आईस्क्रीमवाला सर्वांना गडबड करु नका, असे सांगून बारक्याला हाक मारतो. तो एक आईस्क्रीमचे पार्सल घेऊन गाडीजवळ जातो. गाडीतून कोणीही खाली उतरत नाही. पार्लर घेऊन ती तशीच पुढे निघून जाते. असे प्रसंग हे शहराच्या कोणत्याही कोप-यावर रात्री उशिरा दिसून येतात. त्यामुळे केवळ फुकट बिर्याणीचे प्रकरण समाेर आले म्हणून गाजावाजा हाेत आहे.
पुण्यात महिला पोलीस उपायुक्तांच्या फुकट बिर्याणीची काल राज्यभरात चर्चा रंगली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही दखल घ्यावी लागली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. यथावकाश या बिर्याणीची चौकशी होईल़ मात्र, चौकाचौकात नियमित पाठविल्या जाणा-या या फुकटच्या पार्सलचे काय?.
या ऑडिओ क्लिपवर राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तीव्र भावना उमटल्या आहेत. राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा प्रकारे आपल्या हद्दीतून सर्व काही फुकट घेतात, असा लोकांचा समज होईल, असे या पोलिसांना वाटते. मात्र, काहींचा अपवाद वगळता सर्वत्र ही परिस्थिती दिसून येते. या महिला पोलीस उपायुक्तांनी केवळ ते बोलून दाखविले, अशीही काही जणांची प्रतिक्रिया आहे.
लॉकडाऊन असो अथवा नसो, काही विशिष्ट हॉटेल, काही बार हे रात्री उशिरापर्यंत नियमित सुरु असतात. त्यांच्यावर कधीही कारवाई केली जात नाही़ असे म्हटले जाते, हे कशाच्या जीवावर. पुण्यात पोलीस आयुक्त अथवा परिमंडळ १च्या उपायुक्तपदी कोणीही येवो, मंडईमधील या हॉटेलवर कधीही कारवाई होणार नाही, अशी लॉकडाऊनपूर्वी वंदता होती. (याच महिला उपायुक्तांनी त्यावर कारवाई केली होती) अशी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही हॉटेल, बार असतात. त्यावर पोलिसांची वक्रदृष्टी कधी पडत नाही.
शासनाच्या अन्य कोणत्याही खात्यांपेक्षा पोलीस अधिकारी, कर्मचारी हे सर्वकाळ रस्त्यावर असतात. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी ही हॉटेल, परमिटरुम, पब अशा ठिकाणीच असते. त्यामुळे ही ठिकाणे कधी बंद करायची अथवा कधीपर्यंत चालू द्यायची याची चावी पोलिसांच्या हाती असते. त्याचा गैरफायदा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांकडून घेतला जातो, मग अशा हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी इतरांसाठी पार्ट्या आयोजित करतात. त्यांचे बिल एकतर दिले जात नाही. दिले तरी त्यासाठी खास माणसाची नेमणूक केली गेलेली असते.
----------------
अनेक पोलीस अधिकारी आपल्या हद्दीत आपला रुबाब राहावा, यासाठी अशा प्रकारे कोणतीही गोष्ट फुकट घेत नाहीत. मात्र, त्याचवेळी ते स्वत: पैसे देतात, असेही नसते. त्यासाठी त्यांनी वेगळी व्यवस्था केलेली असते.
-----------------------
काही काही हॉटेलचालकही आपल्या परिसरातील साहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वत:हून हॉटेलला बोलवत असतात. काही जण तर अधिका-यांची आवड लक्षात घेऊन त्यांना नियमित घरी डबे पोहचत करत असतात.
---------------------
काही वर्षापूर्वीची ही गोष्ट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे दौ-यावर आले होते. बारामतीमध्ये ते उतरले होते. त्यानंतर त्यांचा रात्री ग्रामीण पोलीस अधीक्षकांना फोन आला. त्यावर त्यांनी अधीक्षकांना आपण स्वागतासाठी आला नाहीत, असे विचारले. अधीक्षकही खमके होते़ त्यांनी आपल्या साहेबांना सांगितले की, ठरलेल्या कार्यक्रमानुसार उद्या आपली भेट आहे. तेव्हा भेटणारच आहे. तरीही या आयजीची कुरुकुर सुरू होती. त्यावर या अधीक्षकाने त्यांना तुमची व्यवस्था तर उत्तम केली आहे. त्यात काही कमरता नाही ना. कारण आताच तुमचे बिल माझ्यासमोर आले आहे. त्यावर या साहेबांची बोलती बंद झाली.
या ऑडिओ क्लिपमुळे आता पैसे देऊनही पार्सल मागविणाऱ्या पोलिसांची मात्र पंचाईत होणार आहे़