जेजुरी : गेल्या तीन महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या वेतनवाढीचा करार न केल्याने जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि. कंपनीतील कामगारांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जेजुरी एमआयडीसी तील इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा. लि. कंपनीतील वेतनावाढीसह इतर मागण्यांचा करार तीन महिन्यांपूर्वी पुणे कामगार आयुक्त कार्यालयात करण्याचा निर्णय झाला होता. करारानुसार १ एप्रिल २०१४ पासून पुढील तीन वर्षांत ४६०० रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला होता. मात्र ४६०० रुपयांची वेतनवाढ देताना कंपनी कामगारांना देण्यात येणारे इतर भत्ते, बोनस प्रॉव्हिडंट फंड यातून वेतनवाढीची रक्कम वर्ग करीत वेतनवाढीचा करार करीत आहे. वास्तविक वेतनवाढ देताना कामगार कायद्याप्रमाणे मूळ वेतन कायम करूनच वाढ दिली जावी व त्यानुसारच करार व्हावा अशी कामगारांची मागणी होती. कंपनी मात्र नियमबाह्य करार करू पाहत आहे. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनवाढीचा करार रखडवला आहे. करार रीतसर व कायदेशीर मार्गाने त्वरित व्हावा यासाठी कामगारांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रथम पाळी आणि दुसऱ्या पाळीतील असे एकूण १४० कायम कामगार आणि १ हजार कंत्राटी कामगारांंनी या आंदोलनात सहभाग घेतला.
कामगारांचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: March 14, 2015 06:14 IST