जेजुरी : परिसरातील १४ गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने नव्याने उभारण्यात येणाऱ्या नाझरे सुपे येथील वीज उपकेंद्राचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ते येत्या सप्टेंबर अखेर पूर्ण होऊन तेथून विद्यूत पुरवठा होणार का? असा सवाल परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. या उपकेंद्रातून नाझरे क.प..नाझरे सुपे, जवळार्जुन, पांडेश्वर, मावडी क.प., कोळवीहीरे, धालेवाडी, रानमळा, भोसलेवाडी, कोथळे, बेलसर, निळूंज, तक्रारवाडी, साकुर्डे ही गावे व त्यांच्या ११० वाड्यावस्त्यांसाठी विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. या उपकेंद्रातून ६ फीडर काढून प्रत्येक फीडरवर २ ते ३ गावे व त्यांच्या वाड्यावस्त्यांना वीज देण्यात येणार आहे. यामुळे वीज ग्राहकांना योग्य व पुरेशा दाबाने विद्यूत पुरवठा होऊ शकेल. असे नियोजन आहे. सदर वीज उपकेंद्र उभारणीचे काम गेल्या मार्च महिन्यात सुरू झालेले आहे. ठेकेदार साइदीप ईलेक्ट्रिकल्स मार्फत हे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या संदर्भात महावितरण मात्र कोणत्याही परिस्थित आम्ही आॅगस्ट अखेर हे काम पूर्ण करू आणि सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष वीज पुरवठा सुरू करणार असल्याचेच सांगत आहे. सद्या पाऊस नसल्याने वीजेचा प्रश्न कमी प्रमाणावर आहे. मात्र रब्बी हंगामात हा प्रश्न खूपच गंभीर होतो. या साठी या उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या परिसरात विजेची मागणी नसतानाही विद्युत पुरवठा नेहमीच खंडीत होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या प्रकारात वाढ झालेली आहे. कित्येकदा रात्रीच्या वेळी वीजच गायब असण्याचे प्रकार होत आहेत.
वीज उपकेंद्राचे काम संथगतीने
By admin | Updated: August 2, 2014 04:23 IST