राजेगाव : मलठण येथील वीज उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील विहिरींना पाणी असून उभ्या पिकांना पाणी विजेअभावी पाणी देता येत नाही. परिणामी या उपकेंद्राचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील मलठण, वाटलूज, नायगाव व राजेगाव येथील ग्रामस्थांकडून होत आहे. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना उजनी धरणातील बॅक वॉटरचे पाणी हे वरदान असल्याने पाणी मुबलक प्रमाणात आहे. असे असूनदेखील पुरेशा विजेअभावी या भागातील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगावच्या मेंगावडेवस्तीपर्यंत गावांना आलेगाव येथील उपकेंद्रातून; तर उर्वरित राजेगावला भिगवण येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. हे भाग दोन्ही उपकेंद्राच्या शेवटी टोकाला असल्याने या भागात उन्हाळ्यात अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होतो. यामुळे विद्युत पंप व रोहित्र जळणे, वीजवाहक तारा तुटणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विजेच्या समस्यांमुळे भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटर क्षेत्रात पाणी शिल्लक असतानाही या भागातील शेतकऱ्यांची पिके उन्हाळ्यात जळून जातात. त्यामुळे या भागातील शेतकरी या परिसरात वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी सातत्याने करीत होता. यामुळे मलठण येथे वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी येथे मंजूर झालेल्या ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार रमेश थोरात उपस्थित झाले होते. त्या वेळी खासदार सुळे व थोरात यांनी उपकेंद्राचे काम वेगाने करण्याचा आदेश दिला होता. पण दीड वर्ष झाले तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या उपकेंद्रातून मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव या गावांना वीजपुरवठा होणार आहे. विजेची मुख्य वाहिनी टाकण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगची परवानगी आतापर्यंत न मिळाल्याने या उपकेंद्राचे काम रखडले होते.
वीज उपकेंद्राचे काम संथगतीने
By admin | Updated: September 30, 2015 01:18 IST