लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते दापोडी या प्राधान्य मार्गावरील संत तुकाराम नगर स्थानकाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. १६० मीटर लांबीचे व २३ मीटर रुंदीचे हे स्थानक रस्त्यापासून वर २० फूटांवर असून लक्षवेधी झाले आहे. सध्या तीनच डब्याची मेट्रो धावणार असली तरी भविष्यातील गरज ओळखून हा फलाट सहा डब्यांसाठीचा तयार केला आहे. मेट्रोच्या उन्नत मार्गावरील सर्व स्थानके याच प्रकारची असणार आहेत.
स्थानकात जा-ये करण्यासाठी प्रत्येकी १३ प्रवासी क्षमतेच्या चार लिफ्ट आहेत. त्याशिवाय सरकते जिनेही आहेत. दोन स्वतंत्र पुलांवरुन स्थानकात पायी जाता येणार आहे. पहिल्या मजल्यावर तिकीट मिळेल. तिकीट देण्यासाठी यंत्र आहेत. त्यात कार्ड सरकवले की तिकीट मिळेल. तिकीट क्यू आर कोड असणारी आहेत.
संपुर्ण स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा आहे. एलईडी लाईट व्यवस्था, प्रवाशांच्या सुचनांसाठी एलईडी लाईटचाच डिस्प्ले बोर्ड, संकटकाळासाठी हेल्पलाईन सिस्टिम, आपत्ती काळात सावध करणारी अर्लाम यंत्रणा आहे. स्थानकाची ६५ टक्के वीज सौर उर्जेतून मिळवेली आहे. याशिवाय पाणी, दिव्यांगासाठी स्वतंत्र मार्ग असेल.
मेट्रोच्या २६ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक याप्रमाणे २६ स्थानके आहेत. त्यातले संत तुकाराम नगर हे पहिलेच स्थानक आता पूर्ण होत आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय हे दोन मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून महामेट्रोने निश्चित केले आहेत. त्यावरील स्थानकांचे काम गतीने करण्यात येत आहे.