बेल्हा : बोरी-बेल्हा रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात आले; परंतु ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हा रस्ता काही दिवसांपासून उखडू लागला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी व कडेला खडी उखडली आहे. या रस्त्यावर डांबर कमी व खडी जास्त वापरली आहे. ही खजी वरच असल्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवताना मोठी अडचण येत आहे. शालेय विद्यार्थी या खडीवरून पडले आहेत. खडी उखडू लागल्यामुळे हा रस्ता पुन्हा धोकादायक बनला आहे. संबंधित ठेकेदाराचे अधिकारीवर्गाशी लागेबांधे असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. अद्याप एकही अधिकारी या रस्त्याचे काम पाहायला आलेला नाही. हा रस्ता नाबार्डने अंदाजे २ किलोमीटर मंजूर केला असून त्यासाठी निधीची तरतूदही मोठ्या प्रमाणावर केली आहे. हे काम संबंधित ठेकेदाराकडून काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू भोर यांनी केली आहे. वेळोवेळी ‘लोकमत’च्या माध्यमातून बातम्या देऊनही संबंधित ठेकेदारावर काहीही परिणाम होत नाही.(वार्ताहर)
बोरी-बेल्हा रस्त्याचे काम निकृष्ट
By admin | Updated: February 23, 2017 02:18 IST