- नम्रता फडणीस/ प्रज्ञा केळकर-सिंग, पुणे
समाजात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोजच महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना अंगावर शहारे आणतात. रात्रीच्या वेळचा कॅबमधील प्रवास असो किंवा रेल्वेमधील लांब पल्ल्याचा, महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत, हे सध्याचे वातावरण आहे. प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि असुरक्षितता याबाबत तातडीने मदत मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन सुरू करून महिलांसह प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र ९० टक्के महिला या हेल्पलाईनबाबत अनभिज्ञ असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.रेल्वे हेल्पलाईनबाबत महिला जागरुक किती आहेत, याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांना भेट देऊन महिलांशी संवाद साधला. या वेळी महिलांना लांब पल्ल्याचा प्रवास करताना सुरक्षित वाटते का, प्रवासादरम्यान होणारा त्रास, असुरक्षिततेसंदर्भात काही अनुभव आला आहे का, महिला डब्यांमधील पोलिसांची गस्त, रेल्वे हेल्पलाईन, हेल्पलाईनची माहिती आहे का, वाईट प्रसंग घडल्यास सहप्रवाशांकडून मदत मिळते का, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. परंतु, बहुतांशी प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच होती. आपल्यासाठी रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन सुरू केली आहे, तेथे फोन केल्यास प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींसाठी तत्काळ मदत मिळू शकते, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नाही. येथे दोष रेल्वे प्रशासनाचा की महिला प्रवाशांच्या जागरुकतेचा? रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये तसेच, स्थानकांवर हेल्पलाईनसंदर्भात माहितीचे पत्रक लावण्यात आले असूनही, ते बघण्याचे सौजन्य प्रवाशांकडून दाखवण्यात आले नसल्यानेच या हेल्पलाईनला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे.महाराष्ट्र पोलिसांतर्फे रेल्वेतील प्रवाशांना येणाऱ्या अडी-अडचणींसाठी २००८ पासून ९८३३३३११११ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू केली. प्रारंभी, महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाईनवर सर्वसामान्य प्रवासीही मदत मागू शकतात. या क्रमांकावर संपर्क साधल्यास, संबंधित पोलीस ठाण्याला ही माहिती दिली जाते. त्या पोलीस स्थानकातील ठाणे अंमलदार रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने ही माहिती पोहोचवतो. त्यानुसार, तत्काळ योग्य ती कारवाई केली जाते. रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) तर्फे गेल्या वर्षी १८२ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनचे बुथ रेल्वे स्थानकांमध्येही उभारण्यात आले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधल्यास संबंधित भागातील कंट्रोल रूमला कॉल जोडला जातो. रेल्वे पोलीस तक्रारदाराकडून बोगी क्रमांक, आसन क्रमांक आदी माहिती घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. गेल्या वर्षभरात हेल्पलाईनला सुमारे २०% प्रतिसाद मिळाला असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी जनाजागृती फेरी, माहिती फलक, बुथ आदींच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.प्रवासारम्यान महिलांना येणारे अनुभव आणि उपाय बहुतांश महिलांनी प्रवासारम्यान पुरुषांची वाईट नजर, छुपा शारीरिक स्पर्श अशा अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. मात्र, पुरुष पोलिसांवरही तितकासा विश्वास नसल्याने महिला तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचेही पाहणीदम्यान आढळले. महिलांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी कोणावरही अवलंबून न राहता, स्वत:ची काळजी घेणे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य जवळ बाळगणे, अनोळखी व्यक्तीशी खासगी बाबी न बोलणे, मौल्यवान वस्तू जवळ न बाळगणे अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांना सुरक्षितता मिळावी, यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती, त्यानुसार भरती प्रक्रियाही पार पडली. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ते शक्य होऊ शकले नाही. सध्याही रेल्वे पोलिसांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने ठराविक गाड्यांमध्येच गस्त घालण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे, इच्छा असूनही प्रत्येक गाडीमध्ये गस्त घालणे शक्य होत नाही. छेडछाडीच्या घटनांमध्ये महिला तक्रार नोंदवण्यास धजावत नसल्याने संबंधित व्यक्तीला समज देऊन गाडीतून उतरवले जाते. दररोज, या हेल्पलाईनवर एक-दोन कॉल येतात. हेल्पलाईनच्या जनजागृतीसाठी आमचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.- संदीप खिरटकर, निरीक्षक, आरपीएफअद्यापही ब्रिटिशांच्या काळापासून ठरवून देण्यात आलेले मनुष्यबळच पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे मोजक्या मनुष्यबळावरच कामाचा ताण येतो. त्यामुळे सध्या रेल्वेतील गस्त खंडित झाली आहे. हेल्पलाईनवर महिन्यातून साधारणपणे पाच-सहा कॉल येतात. मात्र, संबंधितांना तातडीने मदत पोहोचवली जाते. - एस. जी. कदम, पोलीस हवालदार