कापूरव्होळ : स्त्री हे आदिशक्तीचं दुसरं रूप आहे. समाजाला बरोबरीने पुढे घेऊन जाण्याची ताकद ही स्त्रीमध्येच आहे, असे विचार मा. सभापती सुनीता बाठे यांनी व्यक्त केले. त्या सारोळे, ता. भोर येथे महाभोंडल्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या. सारोळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व एकात्मिक बाल विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेच्या प्रशस्त प्रांगणामध्ये महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रतीकात्मक हत्तीची पूजा करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांनी व मुलींबरोबर सुनीता बाठे यांनी देखील फेर धरून गाणी सादर केली. यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन सुनीता बाठे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेमधील विद्यार्थ्यी संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे मा. सभापती सुनीता बाठे यांनी मुख्याध्यापक शिंदे व त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती भोरच्या मा. सभापती सुनिता बाठे, वृषाली साबणे, रूपाली धाडवे, शिंदे व त्याचे सर्व सहकारी, सुनिता महांगरे, सारोळे, महिला पालक व महिला बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम मॅडम यांनी केले तर आभार मंदा धाडवे यांनी मानले. (वार्ताहर)
स्त्री हे आदिशक्तीचं दुसरं रूप : बाठे
By admin | Updated: November 2, 2015 00:53 IST