शिवसेनेच्या पुणे, पिंपरी-चिंचवड व नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची बुधवारी उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीसाठी पक्षाने काय तयारी केली आहे, युतीबाबत पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे आदी सविस्तर मते त्यांनी जाणून घेतली. पुण्यात शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी जोरदार भूमिका पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आली. त्याचबरोबर, पुण्यात भाजपाही शिवसेनेशी युती करण्याच्या मन:स्थितीमध्ये नाही. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दोन्ही पक्षांनी मंगळवारी स्वतंत्रपणे सर्व ४१ प्रभागांतील उमेदवारांच्या नावांवर विचार करून यादी निश्चित केली आहे. भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाच्या कार्ड कमिटीच्या सदस्यांची बैठक मंगळवारी बाणेर येथील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून अंतिम नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शिवसेनेनेही मंगळवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन १६२ उमेदवारांच्या नावांची यादी तयार केली आहे.आतापर्यंत पुण्यात महापालिकेच्या सर्व निवडणुका भाजपा व शिवसेनेने एकत्रित लढविल्या आहेत. यंदा पहिल्यांदाच भाजपा व शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी गोरेगावमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुणे महापालिकेतील युतीमध्ये आतापर्यंत शिवसेनेने लहान भावाची भूमिका पार पाडली. मागील निवडणुकीत भाजपाने ७५, तर शिवसेने ५८ व रिपाइंने ११ जागा लढविल्या होत्या. आता न लढविलेल्या ९४ व वाढलेल्या १० अशा १०४ जागांवर शिवसेनेला नवीन उमेदवार उभे द्यावे लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. त्यापूर्वी शहरातून शिवसेनेचे २ आमदार निवडून आले होते.
युती तुटणार?
By admin | Updated: January 26, 2017 01:03 IST