कापूरव्होळ : खेड-शिवापूर भागात पुढील आठवड्यात प्रथम नकाशाप्रमाणे रस्ता रुंदीकरणाची हद्द निश्चित करून त्यानंतर संपादन आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न स्थानिकांना विश्वासात घेऊन सोडवू, असे आश्वासन हवेलीच्या प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिले. बर्गे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपस्थित स्थानिक नागरिकांची बाजू बर्गे यांनी ऐकून घेतली. पुणे-सातारा महामार्गावर सहा पदरीकरणासाठी खेड-शिवापूर भागातच कमी-जास्त पद्धतीने संपादन करण्याचे कारण काय, दोन्ही बाजूला समान जमिनी संपादन करा. येथील सातारा-पुणे लेनवर साडेसदतीस मीटर संपादन झाल्याचा दावा ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी केला. तर या भागात तीस मीटरच संपादन झाले असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. प्रशासनाने भूसंपादनाचा शासनमान्य नकाशा सर्वांसमोर खुला करावा, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन हे काम करावे. या ठिकाणी किती संपादन केले आहे, याबाबत प्रशासनालाच योग्य माहिती नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या वादावर तोडगा काढण्यासाठी शासकीय मोजणी करून हद्द निश्चित करू. त्यानंतर पुढील बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेत स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाईल. परंतु प्रथम हद्द निश्चित करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बर्गे यांनी या वेळी उपस्थितांना केले. (वार्ताहर)
स्थानिकांना विश्वासात घेऊनच खेड-शिवापूरला महामार्गाचे रुंदीकरण
By admin | Updated: January 14, 2016 03:51 IST