विल्हेवाट लावणारी यंत्रणाच नाही : पर्यावरणाला पोहोचतेय हानी
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : वजनाने हलके, आकारमानाने मोठ्या असलेल्या थर्माकोलचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तू, काचेच्या वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी सर्रास केला जातो. मात्र, सध्या शहरामध्ये थर्माकोलची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला, नदी-नाल्यांमध्ये साचलेला थर्माकोलचा कचरा अनेक समस्या निर्माण करत आहे. एका खाजगी कंपनीशी थर्माकोलच्या पुर्नप्रक्रियेबाबत महापालिकेची चर्चा सुरु असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले.
दिवाळीच्या काळात इलेकट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पॅकिंग थर्माकोलमध्ये केले जाते. वस्तूंचे पॅकिंग उघडल्यानंतर थर्माकोलचे मोठे तुकडे कोठे टाकायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुका आणि ओला कचरा संकलित करणा-या गाड्यांमध्ये थर्माकोलचा कचरा स्वीकारला जात नाही. कचरा हस्तांतरण केंद्रावर दंड आकारला जातो, हे कारण सांगितले जाते.
-----------------
थर्माकोल जाळल्याने, पुरल्याने बाहेर पडतात विषारी वायु
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : थर्माकोल जाळल्याने किंवा पुरल्याने त्यातून विषारी रसायने उत्सर्जित होतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचते. सध्या शहरात थर्माकोलचे संकलन करणारी कोणतीही यंत्रणा महापालिकेतर्फे उपलब्ध नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिक रस्त्याच्या, नदी-नाल्यांच्या कडेला, शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर थर्माकोल तसेच इतर कचरा फेकतात किंवा जाळण्याचा प्रयत्न करतात, असे दिसून आले आहे.
खडकवासला धरणाकडे जाणारा अर्धा रस्ता कचऱ्याच्या ढीगाने व्यापलेला आहे. शहराजवळून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावर अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात आला आहे. यात थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. योग्य यंत्रणा निर्माण केल्याशिवाय समस्या निकालात निघणार नाही, असे मत जाणकारांनी नोंदवले आहे.
----------------------------
थर्माकोलची विल्हेवाट ही मोठी आणि गुंतागुंतीची समस्या आहे. यावर उपाय म्हणून महापालिका आणि स्वच्छ संस्थेतर्फे खाजगी कंपनीशी चर्चा सुरु आहे. थर्माकोलच्या पुर्नप्रक्रियेला कंपनीने तयारी दर्शवली आहे.
- माधव जगताप, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका
-------------------
थर्माकोलचे विघटन ही अत्यंत जटिल आणि नुकसानकारक प्रक्रिया आहे. थर्माकोल जाळल्यावर त्यातून विषारी वायू बाहेर पडतात आणि प्रदूषण होते. थर्माकोल जमिनीत पुरल्यास घातक रसायने जमिनीत मिसळतात. थर्माकोलची विल्हेवाट हा मोठा प्रश्न आहे. यातून होणारे नुकसान टाळायचे असेल तर युध्दपातळीवर संशोधन करुन थर्माकोलला पर्याय शोधावे लागतील.
- प्रियदर्शनी कर्वे, पर्यावरण अभ्यासक
-------------------------
स्वच्छ संस्थेचे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी शहरातून कचऱ्याचे संकलन करतात. पुर्नप्रक्रिया शक्य असलेला कचरा वेगळा केला जातो. थर्माकोलचे वजन कमी आणि आकारमान जास्त असते. महापालिकेच्या हस्तांतरण केंद्रांवर थर्माकोल स्वीकारला जात नाही. थर्माकोलचे रिसायकलिंग आर्थिकदृष्टया परवडत नाही. थर्माकोल पुर्नप्रक्रियेची तयारी काही कंपन्यांनी दाखवली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर औंध आणि कोथरुड किंवा वारजे या वॉर्डांमधून थर्माकोलचे संकलन करुन संबंधितांकडे सुपूर्त केले जाणार आहे.
- अक्षय बरडे, स्वच्छ संस्था