हडपसर : नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पोस्टासमोर रांगा लावून सकाळपासून थांबले होते. पोस्टाचा दरवाजा उघडला. आता लगेच पैसे मिळतील, असे थांबलेल्या नागरिकांना वाटले. मात्र पैसे अजून आले नाहीत. कधी येतील सांगता येत नाही. हा फॉर्म घेऊन तो भरून रांगेत राहा, अशा सूचना ऐकून नागरिकांना हादराच बसला.सोमवारी बँकांना सुट्टी असल्याने रविवारनंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर आपल्याला पैसे मिळतील, या आशेवर बँकेसमोर व पोस्टासमोर रांगा लागलेल्या दिसत होत्या. सकाळी ७पासून पोस्टासमोर महिला, वृद्धांनीही रांगा लावल्या होत्या. वृद्धांना बसण्यासाठी बाक असल्याने नागरिकांना तेवढा तरी दिलासा मिळाला. पैसे बदलण्यासाठी एकच खिडकी ठेवण्यात आली होती. तर एका खिडकीतून पैसे बदलण्यासाठी फॉर्म दिले जात होते. वृतपत्रातून येणाऱ्या फॉर्मचे कात्रण भरून आणणाऱ्यांकडून ही कात्रणे घेण्यास नकार देण्यात आला. ती कात्रणे न घेता नवीन फॉर्म दिला जात होता. शेड्युल्ड बँकेत पैसे भरण्यासाठी गर्दी दिसत होती. तर काही बँकांत नोटा नसल्याने नागरिकांचा खोळंबा होत होता. अनेक बँकेत अशीच परिस्थिती होती. कोणीच पैसे घेण्यासाठी तयार नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वसामान्यांना पैशासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पैसे जेवढे आहेत, तेवढेच वाटण्यात येतात. (वार्ताहर)
पैसे मिळणार तरी कधी?
By admin | Updated: November 16, 2016 03:16 IST