लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्य पुरवठा करा. जे लाभार्थी आले नाहीत, त्यांना घरी जाऊन धान्य द्या, असे स्पष्ट आदेश शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी सचिन डोळे यांनी सर्व झोनमधील वितरण निरीक्षकांना दिले आहेत.
डोळे यांनी सांगितले, की पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अन्न सुरक्षेचे ३ लाख १४ हजार, तर अंत्योदय योजनेतील ८ हजार १८० असे एकूण या दोन्ही योजनेत ३ लाख २२ हजार १८० लाभार्थी आहेत. तसेच पुणे पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात एकूण ७२४ स्वस्त धान्य दुकानांची संख्या आहे.
आतापर्यंत ९५.११ टक्के लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाला आहे. येणाऱ्या काळात शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत धान्य पुरवण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जे लोक काही कारणास्तव धान्य घ्यायला येणार नाहीत. त्यांना घरी जाऊन धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर कार्यवाही करण्यास सुरू झाली आहे, असे डोळे यांनी सांगितले.
---
कोट
पुणे तसेच पिंपरी शहरात काही अपंग, आजारी नागरिक आहेत. त्याचबरोबर काहींना वेगवेगळ्या कारणास्तव धान्य घेता येत नाही किंवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानांपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्यात येत आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहाेच करणे हा यामागील हेतू आहे.
- सचिन डोळे, अन्न-धान्य वितरण अधिकारी, पुणे शहर
------------------------
फोटो : दिव्यांग, अंध, आजारी लाभार्थ्यांना शहर अन्न-धान्य वितरण विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन धान्य देण्यात येत आहे.