लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत नेपाळी असलेल्या एका रखवालदाराने घराचा दरवाजा तोडून घरातील तिजोरीच चोरून नेली. नारायणगाव येथील येथील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. एस. जी. गोसावी यांच्या घरी ही घटना शनिवारी (दि. १३) रात्री घडली. रुग्णालयात असणाऱ्या रखवालदाराने साथीदाराच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून घरातील तिजोरीसह १९ लाख ७२ हजारांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने, बँक ठेवीच्या पावत्या व महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली.
याबाबत रखवालदार प्रकाश उर्फ वीरेंद्र सावन, प्रकाश यांची पत्नी पार्वती, दिनेश नेपाळी (रा. मंगलसेन, बिनायक, नेपाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चोरीची फिर्याद पवन सोपान गोसावी (रा. स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, खोडद रस्ता, नारायणगाव) यांनी दिली. डॉ गोसावी हे गुरूवारी (दि. ११) दोन दिवसांसाठी पुण्याला गेले होते. त्या वेळी हॉस्पिटलमध्ये रखवालदार म्हणून काम करीत असलेला रखवालदार प्रकाश हा कामावर होता. डॉ गोसावी हे शनिवारी सायंकाळी ६. ३० वा. सुमारास नारायणगावला आले असता हॉस्पिटलच्या वरील दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरातील बेडरूममध्ये असणारी तिजोरी नसल्याचे त्यांना दिसले. तसेच कपाटातील सर्व कपडे, इतर वस्तू अस्तव्यस्त होत्या. त्यावेळी डॉ गोसावी यांनी रखवालदार प्रकाश यानेच ही चोरी केल्याचा संशय आला. डॉ. गोसावी यांनी प्रकाश याला मोबाईलवर संपर्क केला असता त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यामुळे डॉ. गोसावी यांना प्रकाश व याची पत्नी पार्वती व एक महिन्यापूर्वी रखवालदार म्हणून काम करीत असलेला दिनेश नेपाळी हे या चोरीत सहभागी असल्याची खात्री झाली. तिजोरीमध्ये ५०० व २००० रुपयांच्या १० लाख ४२ हजारांची रोख रक्कम, ९ लाखांचे नेकलेस, गंठण, पाटल्या, राणीहार, कर्णफुले इत्यादी असे एकूण ३० तोळे सोन्याचे दागिने, ३० हजारांची अर्धा किलो वजनाची २ चांदीची ताटे व बँकेच्या ठेवीच्या पावत्या व इतर कागदपत्रे होती. पोलिसांना चोरीची माहिती कळताच नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला आहे. घटनास्थळी श्वान पथकचे पोलीस हवालदार गणेश फापाळे, सागर रोकडे यांनी श्वान दुर्गा हिच्या मदतीने मग काढण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाचे ठसे घेतले आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद जवळे,स्थानिक गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
फोटो - नारायणगाव येथे डॉ. एस. जी. गोसावी यांच्या घरी चोरट्यांचा माग काढताना श्वान दुर्गा व पोलीस.