यवत : भारनियमन हवंसं वाटतं, असं म्हणणारं गाव खरोखरंच विरळा. पण वीज जाताच घरात पाणी येत असेल तर?... यवत गावातील ग्रामस्थ त्यामुळेच कधी एकदा भारनियमन होतेय, याचीच वाट पाहताना दिसतात. कारण तो संकेत असतो, नळाला पाणी येण्याचा...!भारनियमनाच्या काळात तासन्तास वीज गायब असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती तशी नवीन नाही. यवत गावात सध्या गावठाण फिडरवर कसलेही भारनियमन नाही. तरीही नागरिक व विशेषत: महिलावर्ग वीज कधी जाईल, याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येते. ही वाट पाहण्याचे एकमेव कारण म्हणजे पाणीटंचाई. यंदा जानेवारी महिन्यातच यवतमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या परिस्थिती पाण्याचा मर्यादित वापर करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नळाला पाणी आल्यानंतर गावात काही लोक नळाला लावलेल्या मोटारद्वारे पाणी ओढतात. याचा परिणाम असा होतो, की ज्यांच्याकडे नळाला मोटार आहे त्यांनाच पाणी मिळते. अनेकांच्या नळाला पाणी येतच नसल्याच्या तक्रारी होत्या. यवत ग्रामपंचायतीने नामी उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे नळाला पाणी सोडण्यात आल्यानंतर गावातील वीजपुरवठा खंडित करणे. नळाला पाणी सोडल्यानंतर गावातील वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे सर्वांच्या नळाला पाणी येते. ऐन रंगात आलेली मालिका जेव्हा भारनियमनाने बंद होते तेव्हा महिलावर्ग त्रागा करतात, मात्र सध्या गावात वीज गेली, की महिला नळाला पाणी आले असेल, म्हणून आनंदित होतात व हंडा-कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी धावतात.
जेव्हा वीज जाते... तेव्हा नळाला पाणी येते...!
By admin | Updated: January 19, 2016 01:49 IST