यवत : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती असावी, जेणेकरून भविष्यात न्याय मिळविण्यासाठी अडचण येणार नाही. यासाठी यवत येथील शालेय मुलांना यवत पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांचे कार्यालयीन कामकाज व त्यांच्या वापरातील शस्त्रांची माहिती दिली.भारतीय पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त यवत पोलीस ठाण्यात ‘रायझिंग डे’ साजरा करण्यात आला. या वेळी यवतमधील विद्या विकास मंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून कामकाजाची माहिती देण्यात आली.या वेळी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘भविष्यातील सुजाण नागरिक होण्यासाठी सगळ्यांनी सजग राहाणे गरजेचे आहे. पोलीस नागरिकांचे खरे मित्र असतात. यासाठी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. दक्षता पाळल्यास समाज सुरक्षित बनू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी दक्षता पाळण्याची आतापासून सवय लावून घ्यावी.’’ पोलीस हवालदार सुनील भिसे, दशरथ बनसोडे, संजय नगरे यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज, विविध विभागांची माहिती दिली.
यवत पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांनी हाताळली शस्त्रे
By admin | Updated: January 11, 2017 01:58 IST