पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून शिवाजीनगर येथे एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्याला फुलांचा हार अर्पण करून अभिवादन केले.
शिव-जन्मोत्सवानिमित्ताने शिवरायांचा पाळणा, पोवाडे, पालखी सोहळा आयोजित केले होते. वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचे व्रत अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने पाळले असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी प्रास्ताविक केले. मालोजीराजे छत्रपती कोल्हापूर संस्थान यांनी जनतेस शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, विकास पासलकर यांनी पालखीला खांदा दिला.
डॉ.अभिजित सोनवणे यांच्या प्रयत्नातून भीक मागणे सोडून वेगवेगळ्या व्यवसायात आलेल्या भिक्षेकऱ्यांच्या सोबत आम्ही या वर्षीची शिवजयंती साजरी केली. या सर्व भिक्षेकऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने परत आयुष्यात कधीही भीक न मागण्याची शपथ यावेळी घेतली. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्मृतिशेष स्वप्निल कोलते यांची मुलगी गाथा स्वप्निल कोलतेला शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला.
आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिजाऊंचे वंशज अमरसिंह जाधवराव, बार कौन्सिल अध्यक्ष सुधीर मुळीक, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, विराज तावरे, जितेंद्र साळुंखे, राजाभाऊ पासलकर, दत्ताभाऊ पासलकर, मंदार बहिरट, युवराज ढवळे उपस्थित होते. स्नेहल पायगुडे यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली.