पिंपरी : शहरातील अर्ध्या भागात गुरुवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाण्यासाठी वणवण भटकण्यासाठी वेळ आली. बोअरिंगच्या नळावर भांडे घेऊन नागरिकांची झुंबड उडाली होती. तर टंचाईत लाखो लिटर पाणी वाया गेल्याबद्दल कृष्णानगरवासीयांनी नाराजी व्यक्त केली. पवना धरणात पाणीसाठा घटल्याने महापालिकेने पाणीकपातीचे धोरण अवलंबिले. २ जुलैपासून एक वेळ पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानंतरच्या कालावधीत पाऊस न झाल्याने धरण साठ्यातील घट कायम होती. भविष्यात पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले. त्याची सुरुवात आजपासून झाली. दिवसाआड पाण्याबाबत महापालिकेने जनजागृती करूनही अनेक रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करून न ठेवल्याचे दिसून आले. घरातील पाणी संपल्याने पंचाईत झाली. स्वयंपाक, तसेच आंघोळ, स्वच्छतागृहासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. नाईलाजास्तव स्वयंपाकाला बोअरच्या पाण्याचा वापर करावा लागला. हंडे व कळशी घेऊन फिरतानाचे चित्र या भागात दिसले. रिक्षा, टेम्पो, दुचाकीवरून पिंप भरून नेताना नागरिक दिसत होते. दरम्यान, कृष्णानगरमध्ये पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन टाकीच्या दुसऱ्या व्हॉल्व्हच्या साहाय्याने हे पाणी वळविले. हे पाणी वळवून चिखली, मोरेवस्ती भागाला सोडण्यात आले. आज येथे पाणीपुरवठा होणार नसतानाही मुबलक पाणी आल्याने रहिवासी खूष झाले. दुपारी दीडच्या सुमारास ही गळती थांबविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. टाकीत पाणी सोडण्याचे खराब झालेल्या व्हॉल्व्हवर दाब देऊन व्हॉल्व्ह निघाला. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)
पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण
By admin | Updated: July 18, 2014 03:31 IST