पुणे : गुजराथमधून कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात काही दिवसांपूर्वी दाखल झालेले दोन आशियाई सिंह (तेजस व सुबी) चांगले स्थिरावले आहेत. मात्र त्यांना ठेवण्यासाठी खंदक बनविण्याचे काम पूर्ण होण्यास आणखी महिनाभर लागणार असल्याने सिंह दर्शनासाठी पुणेकरांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.देशभरातील प्राणीसंग्रहालयांमध्ये प्राणी व पक्ष्यांची घेवाण-देवाण करण्यात येते. गुजराथ राज्यातील वनविभाग व सक्करबाग प्राणीसंग्रहालय यांच्याकडून पुण्याच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासाठी दोन सिंहांची भेट देण्यात आली आहे. त्याबदल्यात राजीव गांधी प्राणी संग्रहालयाने ५ विदेशी जातींचे पक्षी सक्करबाग प्राणीसंग्रहालयास भेट म्हणून दिले आहेत. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण, गुजराथ सरकार व महाराष्ट्र राज्य वनविभाग यांच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. यावेळी उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, कात्रज प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव उपस्थित होते. सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील आशियाई सिंह तेजस (नर) व सूबी (मादी) यांना २५ डिसेंबर २०१६ रोजी पुण्यात आणण्यात आले. दोघांचेही वय ६ वर्षे इतके असून ते प्रजननक्षम आहेत. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील ‘क्वारंन्टीन’ विभागात त्यांना दाखल करून घेण्यात आले आहे. सक्करबाग ते पुणे असा सलग प्रवास करताना दोन्ही प्राण्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्याचबरोबर नवीन जागेत आणल्याने त्यांच्यावर ताण जाणवत होता. त्यामुळे त्यांना पशुवैद्यकीय चिकित्सकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. आता दोघेही प्राणीसंग्रहालयात बऱ्यापैकी स्थिरावले आहेत. त्यांना ठेवण्यासाठी खंदक बांधण्याचे काम लगेच सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या दर्शनासाठी सिंह खुल करण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास आणखी एक महिन्यांचा कालावधी लागणार आहे.कात्रज प्राणीसंग्रहालयात सध्या ४०५ प्राणी आहेत. या प्राणीसंग्रहालयास वर्षाला १८ लाख इतके पर्यटक भेट देतात. त्यातून पालिकेला साडे तीन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. या प्राण्यांच्या खाद्यासाठी पालिकेला दरमहा सव्वा कोटी रूपये खर्च करावे लागतात. सिंहाला दिवसाला ६ ते ८ किलो बिफ खाण्यासाठी लागते. त्यासाठी महिन्याला २५ हजार रूपये इतका खर्च येतो तर हत्तीसाठी महिन्याला ४५ हजार रूपयांचा खर्च येतो. (प्रतिनिधी)
सिंहांच्या दर्शनासाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा
By admin | Updated: January 25, 2017 01:46 IST