वाघोली : वाघोली येथे बीआरटी टर्मिनल्ससाठी अडीच एकर जागेची मागणी पालिकेने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली असली तरी जागेबाबत होणारा विरोध लक्षात घेता ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालिका अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची गुरुवारी ३१ रोजी जागा उपलब्ध करून देण्याकरीता चर्चा केली. पालिकेने केलेल्या अपेक्षाभंगाचा पाढा ग्रामस्थांनी वाचून टर्मिनल्ससाठीची जागा देण्याबाबत ग्रामसभेमध्येच निर्णय घेण्यात येईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. नगर रस्त्यावर असणाऱ्या बीआरटीकरीता वाघोली येथे टर्मिनल्स उभारणीसाठी प्रशासनाकडून अडीच एकर जागा मिळावी, अशी मागणी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र वाघोली ग्रामस्थांचा विचार न करता पालिकेने घेतलेल्या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. ग्रामस्थांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानने पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या आठवडयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु पालिकेचे अधिकारी उपस्थित झाले नसल्यामुळे बैठक रद्द झाली होती. गुरूवार दि. ३१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, पीएमपीएमएलच्या मुयरा शिंदेकर यांच्या समवेत सरपंच संजीवनी वाघमारे, उपसरपंच मंदाकिनी जाधवराव व ग्रामस्थांची बैठक झाली. वाघोली येथे पालिकेने बीआरटी टर्मिनलकरीता जागेची मागणी केली असली तरी वाघोली ग्रामस्थांकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे़ पालिकेला जागा का द्यायची असा प्रश्न उपस्थित करून समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. यामध्ये वाघोली परिसराला भामा आसखेडमधून येणारे पाणी इतरत्र वळविण्यात आला असल्यामुळे पालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.ग्रामपंचायतीतर्फे बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेच्या निर्णयाकडेच ग्रामस्थ आणि पालिका अधिकाऱ्यांचे डोळे लागून राहिले आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांनी जागेबाबत चर्चा करण्याची मागणी केल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार ग्रामस्थांशी चर्चा केली असून पालिकेमध्ये वाघोलीकरांच्या मागणीचा निश्चीतच प्राधान्याने विचार केला जाईल. ग्रामसभेमध्ये सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.- ओमप्रकाश बकोरीया, अतिरिक्त आयुक्तबीआरटी मार्ग मनपा हद्दीपर्यंतच असले तरी प्रवाशांची मोठी संख्या वाघोली परिसरापर्यंत असून बीआरटी टर्मिनल्सचा फायदा वाघोलीकरांना सर्वाधिक होणार आहे. बसथांब्याअभावी महामार्गावर होणारी गर्दी टर्मिनलमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर वाहतूककोंडी कमी होईल. पुढे शटल सेवा सुरू करण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारल्यानंतर ताणदेखील कमी होण्यास मदत होईल.- मयुरा शिंदेकर, पीएमपीएमएल बीआरटी प्रमुख
वाघोली बीआरटी टर्मिनलचा चेंडू ग्रामसभेत
By admin | Updated: January 1, 2016 04:28 IST