शेलपिंपळगाव : जागतिक ‘महिला दिनी’ वडगाव घेनंद (ता. खेड) येथील रणरागिणींनी एकत्र येऊन गावात दारू, लग्नाची वरात व जुगार बंदीचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर केला. यातून त्यांनी इतर गावांपुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता नितनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष ग्रामसभा बैठकीत शेकडो महिलांच्या उपस्थितीत तीन महत्त्वपूर्ण ठरावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ग्रामसभेची सुरुवात माजी गृहराज्यमंत्री आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. याप्रसंगी सरपंच ललिता नितनवरे, ग्रामसेविका एस. डी. भालसिंग, ग्रामपंचायत सदस्य चरणदास नितनवरे, मारुती बवले, उज्ज्वला बवले, माजी सरपंच ज्योती बवल आदींसह शेकडो महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेविका एस. डी. भालसिंग यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग (ठराव नं. ४०) वाचून दाखविल्यानंतर ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. परमिटरूम व बियरबार परवानगीसाठी आलेल्या अर्जांची संबंधित व्यक्तीने माघार घेतल्यानंतर महिलांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. ग्रामपंचायतीने अशा व्यवसायाला परवानगी देऊ नये (ठराव नं. ४१) असा ठराव सर्वानुमते मंजूर केला. ‘स्वाइन फ्लू’विषयी ग्रामपंचायत सदस्य चरणदास नितनवरे व स्रीभ्रूणहत्या याविषयी रेश्मा बवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामसभेसाठी आळंदी पोलीस ठाण्याचे दत्ता जाधव, दगडे, गरुड आदी कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. उज्ज्वला बवले यांनी सूत्रसंचालन तर पूजा बवले यांनी आभार मानले. (वार्ताहर)
वडगाव घेनंदला दारू, वरात, जुगारावर बंदी
By admin | Updated: March 10, 2015 04:47 IST