पुणे : महापालिका निवडणुकीत इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्या गेल्याने अनेकांनी पक्षांतरे केली़ त्यामुळे कोण कोणत्या पक्षात हे अजूनही मतदारांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाही़ दुसरीकडे प्रभाग पद्धतीमुळे पुणेकरांना एकाचवेळी चार जागांसाठी मते देण्याची वेळ प्रथमच आली आहे़ हे कमी असतानाच एकाच प्रभागात एकाच आडनावाचे चार ते पाच उमेदवार रिंगणात उतरले आहे़ ४१ पैकी १५ प्रभागात एकाच आडनावाचे अनेक उमेदवार रिंगणात आहेत़ त्याशिवाय काही प्रभागातील जागांवर तर उमेदवारांचे नाव आणि आडनावही सारखे आहे. त्यामुळे आपण ठरविलेल्या नेमक्या त्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदारांनाच खरी परीक्षा द्यावी लागणार आहे़ यंदा प्रत्येकालाच चार जागांसाठी मतदान करायची संधी मिळाली आहे़ प्रभागातील अ गटातील नावे संपल्यानंतर एक जागा कोरी ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर त्याखालीच ब गटातील व त्यानंतर क व ड गटातील उमेदवारांची नावे असणार आहेत़ त्यामुळे एका मशिनवर दोन गटातील उमेदवारांची नावे येणार आहेत़ कळस -धानोरी प्रभाग क्रमांक १ मध्ये टिंगरे आडनाव असलेले ५ उमेदवार रिंगणात आहेत़ फुलेनगर - नागपूर चाळ प्रभाग क्रमांक २ मध्ये तीन शेख उमेदवार आहेत़ खराडी -चंदननगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये पठारे आडनाव असलेले एकूण ६ उमेदवार उभे आहेत़ वडगाव शेरी -कल्याणीनगर या प्रभाग क्रमांक ५ मधून ५ गलांडे रिंगणात उतरले आहेत़ येरवडा प्रभाग क्रमांक ६ मध्ये तीन देवकर आडनाव असलेल्या महिला निवडणूक लढवत आहेत़ औंध -बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून प्रत्येकी तीन गायकवाड आणि कांबळे रिंगणात उतरले आहेत़ बाणेर -बालेवाडी, पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निम्हण आडनाव असलेले तिघे उभे आहेत़ ताडीवाला रोड -ससून हॉस्पिटल प्रभाग क्रमांक २० मध्ये तीन शेख तसेच तीन शिंदे निवडणूक लढवत आहेत़ वानवडी प्रभाग क्रमांक २५ मध्ये चार जगताप आडनाव असलेले उमेदवार उभे आहेत़ कोंढवा -मिठानगर प्रभाग क्रमांक २७ मध्ये शेख आडनाव असलेले ५ उमेदवार रिंगणात आहेत़ आंबेगाव -दत्तनगर प्रभाग क्रमांक ४० मधील अ गटात तीन बेलदरे आडनावाचे उमेदवार असून, एकूण चार बेलदरे या प्रभागात निवडणूक लढवत आहेत़ कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४१ मध्ये चार कामठे आडनाव असलेले उमेदवार निवडणूक लढवत आहेत़ (प्रतिनिधी)
मतदारांची आता खरी परीक्षा
By admin | Updated: February 15, 2017 02:11 IST