पिंपरी सांडस : कचरा डेपोच्या हालचाली वाढल्याने पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न हवेलीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर व तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी केला; मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नसून ते ‘कचरा डेपो नकोच!’ असे सांगून मतदान बहिष्कारावर अद्याप ठाम आहेत. पिंपरी सांडस येथे होणाऱ्या कचरा डेपोबाबत माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी माहिती आधिकारात माहिती मिळाली असता, त्या ठिकाणी सर्व परवानग्या मिळाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पिंपरी सांडस ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबत ठराव केला. तो ठराव गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. त्यामुळे तातडीने ग्रामस्थांची बैठक बोलावली होती. ही बैैठक मंगळवारी दुपारी झाली. बैठकीसाठी हवेलीचे तहसीलदार प्रशांत मिसाळ, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, निवडणूक निर्णय अधिकारी पवार, सर्कल जाधव, तलाठी शेवाळे हे उपस्थित होते. पिंपरी सांडस ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्ण गजरे, उपसरपंच रामभाऊ शिंगटे, प्रकाश जमादार, दत्तात्रय सातव, सतीश भोरडे, संतोष कोतवाल, विजय भोरडे, अशोक चव्हाण, प्रकाश कसुरे, अनिल काळे, रघुनाथ हरपळे, अंकुश ढगे, विकास कोतवाल, माहिती सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे, भोरडे, प्रकाश भोरडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्यामराव कोतवाल, शिवाजी गोते, बकोरी, वाडेबोल्हाई, अष्टापूर, शिरसवडी, आजूबाजूच्या सर्व गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंचांनी गावाचा विकास झाला नाही तरी चालेल; परंतु कचरा डेपो नकोच, असे ठणकावून सांगितले. प्रकाश भोरडे यांनी विरोध करण्याबाबत विचार मांडले व माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी कचरा डेपोबाबत मिळालेल्या परवानग्यांची माहिती दिली. (वार्ताहर)
मतदान बहिष्कारावर ग्रामस्थ ठाम
By admin | Updated: February 9, 2017 03:18 IST