ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २ - विधानपरिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस... महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तापत असलेले राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर बुधवारी वाडेशवर कट्टयावर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. हास्यविनोदात एकमेकांना चिमटे काढत त्यांच्यामध्ये जोरदार फटाकेबाजी यानिमित्ताने झाली.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, भाजपाचे अध्यक्ष योगेश गोगावले, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली उडी, महापालिका निवडणुकीमुळे तापत असलेले वातावरण याची चर्चा या कट्टयावर रंगली. त्याचबरोबर राजकीय किस्से आणि जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.
राजकीय नेत्यांमध्ये असलेले खेळीमेळीचे वातावरण हे पुण्याचे वेगळेपण असल्याची भावना वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली. वाडेशवर कट्टा हा स्नेहाचा कट्टा असल्याचे रमेश बागवे यांनी सांगितले.
पुण्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांना एकत्र आणणाऱ्या वाडेशवर कटट्याचा उपक्रम गेल्या ४ वर्षांपासून सुरू आहे. अंकुश काकडे, गोपाळ चिंतल, सतीश देसाई व श्रीकांत शिरोळे या चौघा मित्रांनी याची सुरुवात केली आहे.