बारामती : महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे माळेगाव (ता. बारामती) येथील शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. सहा दिवसांपूर्वी शेतात वीजवाहक तार तुटून पडली होती. याबाबत या शेतकऱ्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली; परंतु ‘या तारेने काही होत नाही,’ असे सांगून आधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची बोळवण केली. मात्र, गुरुवारी (दि. १०) सकाळी शेतात काम करीत असताना याच वीजवाहक तारेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. राजेंद्र भाऊसाहेब तावरे (वय ५२, रा. माळेगाव खुर्द, खडक माळवाडी, ता. बारामती) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सहा दिवसांपूर्वी तावरे यांच्या शेतात वीजवाहक तार तुटून पडली. शेतात काम करताना इजा होऊ नये म्हणून तावरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तावरे यांच्या शेतात येऊन पडलेल्या वीजवाहक तारेची पाहणी केली व ‘या तारेने काही होत नाही,’ असे सांगितले. मात्र, गुरुवारी (दि. १०) सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेलेले तावरे यांना याच वीजवाहक तारेचा जबर धक्का बसला. तावरे यांचे भाऊ किसन भाऊसाहेब तावरे यांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी केल्यावर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजेंद्र तावरे यांना मृत घोषित केले. यामुळे माळेगावचे ग्रामस्थ संतप्त होवून त्यानी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. मृतदेहदेखील कार्यालयासमोरच ठेवण्यात आला होता. बारामती-नीरा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यात टायर पेटविण्यात आले. त्यामुळे तणाव वाढला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवा, असा आग्रह ग्रामस्थांचा होता. तावरे यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर संकट आले आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला महावितरणच्या सेवेत घ्यावे, असादेखील आग्रह होता. आक्रमक ग्रामस्थांमुळे महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी फिरकले नाहीत. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी भरपावसात ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनीदेखील माहिती घेतली. तरीदेखील ग्रामस्थ शांत झाले नाहीत. अखेर त्यांच्या मुलाला नोकरीत घेण्याच्या अश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिका मृत्यू अशी नोंद केली आहे. सायंकाळी ७ पर्यंत चर्चाच सुरू होती. (प्रतिनिधी)मृत तावरेंच्या मुलाला महावितरणमध्ये नोकरीस घेणारवीजवाहक तार तुटून मृत्यू झालेल्या राजेंद्र तावरे यांच्या मुलाला महावितरणमध्ये नोकरीस घेतले जाईल. तसा प्रस्ताव महावितरणला देण्यात येईल. त्याचबरोबर, कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचे आश्वासन महावितरणचे परिमंडळ अधिकारी नागनाथ इरवाडकर, बारामती मंडळाचे अधिक्षक अभियंता सदाकळे यांनी दिले. या आश्वासनानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, चंद्रकांत कांबळे, नगरसेवक सुनील सस्ते, माजी पंचायत समिती सदस्य दीपक तावरे, उपसरपंच सचीन तावरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. महावितरणकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला होता. त्यावर तोडगा निघाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्याच बरोबर तावरे यांचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. महावितरणच्या वतीने तातडीची २५ हजारांची मदत देण्यात आली. बारामती-नीरा मार्गावर रास्ता रोको संतप्त ग्रामस्थांनी बारामती-नीरा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यात टायर पेटविण्यात आले. त्यामुळे तणाव वाढला होता. पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी या वेळी उपस्थित होते. मृतदेह महावितरणच्या कार्यालयासमोर संबंधित घटनेची माहिती मिळताच माळेगाव येथील ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकून जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. मृतदेह महावितरणच्या माळेगाव येथील कार्यालयासमोर ठेवला.
महावितरणचा बळी
By admin | Updated: September 11, 2015 04:38 IST