नववर्ष सुरुवातीला येणारा मकरसंक्रांत हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रम आणि पूजेबरोबरच पतंग उडवून हा उत्सव साजरा केला जातो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच पतंग उडवण्यास उत्सुक असतात. परंतु, मध्यंतरी या पतंग उडवण्याच्या उत्सकतेने पक्ष्यांचे जीव धोक्यात येऊ लागले. म्हणून सरकारने या जेवघेण्या चायनीज मांजावर बंदी घातली. तरीही विक्रेत्यांकडून या मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ पतंग आणि मांजा विक्रेत्या दुकानदारांशी संवाद साधला.
सध्या बाजारात चायनीज मांजा उपलब्ध नाही. परंतु, इतर जाड आणि बारिक मांजा उपलब्ध आहेत. एक कांडी मांजाची किंमत २०० ते ३०० रुपये आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मांजा आणि पतंग दोन्हीला कमी प्रमाणात मागणी आहे.
चायनीज मांजा हा वर्षानुवर्षे टिकून राहतो. एकदा विकत घेतला तरी खराब होत नाही. तंगूस मांजाला काचेची पूड आणि चरस लावून हा मांजा तयार केला जातो. पावसात भिजला तरी तो मजबूत राहतो. त्यामुळे नागरिकांनी दोन-तीन वर्षांपूर्वी घेतलेले मांजा ते आताही वापरत असतात.
कोट
दर वर्षी कावळा, घार आणि कबूतर अशा पक्ष्यांच्या मांजाने अपघात होतात. त्यापैकी १० ते १२ पक्षी कात्रज उद्यानात दाखल होतात. त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याव्यतिरिक्त मृत्यू पावणारे पक्षी उद्यानात आणले जात नाहीत.
- अनिल खैरे, कार्यकारी अधिकारी, वन्यप्राणी अनाथालय, कात्रज
कोट
आम्ही दोन वर्षांपासून चायना मांजा विकत नाही. त्यावर बंदी असल्याने आम्ही विक्रीचा धोका पत्करू शकत नाही. आपल्या रविवार पेठ भागात चायनीज मांजा विकताना दिसणार नाहीत. नागरिकांकडे दोन-तीन वर्षापूर्वीचे मांजा असतील.
- मुझफर सय्यद, पतंग आणि मांजाविक्रेते
कोट
कावळा, कबूतर आणि घार या पक्ष्यांना मांजापासून धोका असतो. कारण, शहरी भागात यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. त्यांना सर्व प्रकारच्या मांजापासून धोका असतो. चायनीज मांजा तुटत नसल्याने त्यापासून अधिक धोका असतो. त्यांच्या पंखात अडकून इजा होते. गळ्याला कापल्यावर जीव जाण्याची शक्यता असते. आता तर मांजामुळे माणसांचेही अपघात होऊ लागले आहेत. शहरातील नागरिकांनी शक्यतो पतंग उडवू नयेत. पतंग उडवण्याची हौस शहराबाहेरील मोकळ्या जागेत पूर्ण करावी.
- डॉ. सत्यशील नाईक, पक्षीमित्र