पुणे : कचऱ्याचा शहरातील प्रश्न जटील होत चाललेला असतानाच नागरिकांनी कचरा पेटवून द्यायला सुरुवात केली आहे. कोंढव्यातील कौसरबागेमध्ये अशाच प्रकारे पेटवलेल्या कच-यामुळे कोंढवा पोलीस चौकीच्या आवारातील सात दुचाकी जळून खाक झाल्या. यातील एका दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला. परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी परिस्थिती हाताळत ही आग आटोक्यात आणली.अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस चौकीमधील वाहनांना आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला गुरुवारी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांना समजली. अवघ्या पाचच मिनिटात भवानी पेठ मुख्य कार्यालयाचा बंब घटनास्थळी पोचला. स्टेशन आॅफीसर मुबारक शेख, तांडेल राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, सचिन जवंजाळे, कैलास शिंदे, रवी बारटक्के, चालक कोळी यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. पोलीस चौकीशेजारील जागेमध्ये टाकण्यात आलेला कचरा पेटवण्यात आलेला होता. रस्त्यावर पसरलेला कचरा पेटत गेला. ही आग तशीच पुढे पोलीस चौकीमधील वाहनांना भिडली. अवघ्या दहा मिनिटात दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली.
कचरा पेटल्याने पोलीस चौकीतील वाहने जळाली
By admin | Updated: April 3, 2015 03:32 IST