यवत येथील लसीकरण केंद्रात काल (दि. ६) आलेल्या लसींची संख्या कमी तर लस घ्यायला आलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने गोंधळ उडाला होता. या वेळी राजकीय श्रेयवादातून जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व सरपंच समीर दोरगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्याबाबत प्रतिक्रिया नोंदविताना कदम म्हणाले की, गावातील काही नागरिकांनी तक्रार केल्याने लसीकरण केंद्रात पाहणी करण्यासाठी गेलो होतो. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारी कोरोना प्रतिबंधक लस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात वितरित केली जात आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण काही काळ विस्कळीत झाले होते. या वेळी जिल्हा परिषदेत लोकसंख्येच्या मानाने यवत गावात अधिक लस मिळावी तसेच खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात यवत येथे वेगळे लसीकरण केंद्र करण्यासाठी ठाम भूमिका घेतली होती. यामुळे यवतमध्ये लसीकरण केंद्र सुरू होऊ शकले आणि नागरिकांना न्याय मिळाला. यात कोणीही राजकारण आणू नये, असेही कदम यांनी सांगितले.
लसीकरणात वशिलेबाजी होऊ नये : गणेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST