लसींचा पुरवठा समान व योग्य प्रमाणात करण्यात यावा, लसीकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने एक समिती स्थापन करून नियंत्रण ठेवावे. कोथरूड व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांच्या अनेक लसीकरण केंद्रांच्या बाहेर किंवा आसपास राजकीय पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी करून लसीकरण केंद्रे स्वतःच्या ताब्यात असल्यासारखे चित्र निर्माण केले आहे.
लसीकरण केंद्रांवर गर्दीचे नियंत्रण करण्यात राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते व माननीय मदतीपेक्षा अडथळाच निर्माण करत आहेत. ऑनलाईन नोंदणी प्रकिया असूनसुद्धा लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते आपल्या मर्जीतल्या नागरिकांना रांगेमध्ये न लावता व ऑनलाईन नोंदणी न करता थेट लस देण्यासाठी घेऊन जात असल्याने पहाटेपासून जे नागरिक रांगेत आहेत, त्यांच्यामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये भांडणाचे खटकेही अनेकदा उडत आहेत, अशा अनेक तक्रारी अनेक लसीकरण केंद्रातील अधिकारी व नागरिक देत आहे.
आपल्या मर्जीतल्यांना लसीकरण करण्यावरून वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद होण्याची दाट शक्यता आहे. या वादातून टाळेबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येईल.
या दोन्ही मतदारसंघांत पालिकेच्या मालकीच्या जाहिरातीसाठीच्या अशा अनेक जागा व डिजिटल बोर्ड आहेत की, जिथे लसीकरणाची जाहिरात व माहिती नागरिकांना मोफत मिळू शकेल. त्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी करून लसीकरण केंद्र बळकावण्याची काहीही गरज नाही. तरी आपणास विनंती की, असे अनधिकृतपणे फ्लेक्स बॅनर्स लवकरात लवकर काढावे व गर्दी नियंत्रित करून रांगा लावण्यासाठी पालिकेचे शिपाई नेमण्यात यावे; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, याची आपण नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सुहास निम्हण, शाखा अध्यक्ष मुकेश खांडरे, किशोर इंगवले उपस्थित होते.