चिंचवड : आॅनलाइन अॅपच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी या सुविधेचा वापर सुरू केला आहे. मात्र ही सुविधा देणाऱ्या व्यक्ती व्यापाऱ्यांची दिशाभूल करत पैशांची अफरातफर करत असल्याची घटना चिंचवडमध्ये नुकतीच घडली आहे. सध्या सर्वाधिक वापरात असलेल्या या आॅनलाइन अॅपच्या कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्र असल्याशिवाय दुकानात प्रवेश देऊ नये, यासह अॅप वापरताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे.चिंचवड मधील इंदिरानगर येथे हनुमान मिनी मार्केट या दुकानदाराचे आॅनलाइन अॅपच्या वॉलेटमध्ये जमा झालेले पैसे बॅँकेच्या खात्यात जमा होत नव्हते. यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, पैसे जमा झाले नाहीत. हे पैसे जमा करता यावे म्हणून संबंधित कंपनीच्या व्यक्तीला फोन केला. या व्यक्तीने दुकानात येऊन मोबाइल मागितला. बँकेची संपूर्ण माहिती विचारली. चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करतो असे सांगितले. काही वेळ मोबाईल पाहण्यात घालविल्यानंतर पैसे जमा केल्याचे सांगितले. मात्र, पैसे जमा झाल्याचा मेसेज न आल्याने दुकानदाराला संशय आला. अॅपमधील पैसे कमी झाले. मात्र, बँक खात्यात जमा का झाले नाहीत याची विचारणा केल्यावर थोड्या वेळेत जमा होतील असे सांगत विषय बदलून अॅप वापराची इतर माहिती देऊन निघू लागला.मात्र, दुकानदाराने पैसे जमा झाल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. आजूबाजूच्या दुकानदारांना बोलाविले. त्या व्यक्तीकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र, त्या व्यक्तीने कामाचे पत्र कंपनीने दिल्याचे दाखविले. परंतु, ओळखपत्र दिले नसल्याचे सांगितले. कंपनीच्या वरिष्ठांना पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले हे तपासायला सांगतो, असे सांगत त्याने फोनही केला. मात्र दुकानदाराने पोलीस तक्रार करणार असल्याचे सांगताच त्या व्यक्तीने काही वेळातच दुसऱ्या खात्यात जमा केलेली रक्कम पुन्हा दुकानदाराच्या खात्यात जमा केली. याबाबत दुकानदाराने वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगून घडलेला प्रकार सांगितला. मात्र, या व्यक्तीला आम्ही कामावरून दोन दिवसांपूर्वीच काढले असल्याचे सांगत हात वर केले. पोलिसांचा धाक दाखविल्यानंतर तुमचे पैसे मी माझ्याच खात्यावर जमा केल्याची कबुली त्या व्यक्तीने दिली. कोणतेही ओळखपत्र नसताना आॅनलाइन अॅपच्या नावाखाली शेकडो तरुण काम करत असल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)
आॅनलाइन अॅप वापरताय, सावधान!
By admin | Updated: January 23, 2017 02:55 IST