पुणे : शहरामध्ये सुरू असलेल्या अनेक बांधकामांसाठी सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे, मात्र तपासणी पथकांकडून विशेष कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही. पाण्याच्या या गैरवापराकडे दुर्लक्ष केल्यास उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणांमध्ये निम्माच साठा झाल्याने शहरामध्ये ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर बांधकाम, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव येथे पाण्याचा गैरवापर न करण्याच्या सक्त सूचना आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पाणीकपात नसतानाही बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास महापालिकेची परवानगी नाही. मात्र तरीही बांधकामांसाठी पाण्याचा गैरवापर होत आहे.कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, हडपसर, येरवडा, खराडी आणि चंदननगर भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यांच्याकडून महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी बांधकामांसाठी वापरले जात आहे. कोथरूडमध्ये बांधकामांसाठी पाणी वापरले जात असल्याची तक्रार महापालिकेकडे आली आहे, मात्र त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचे स्थानिक रहिवासी अनिल जाधव यांनी सांगितले. या बांधकामांसाठी पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसताना पालिकेने बांधकामांस परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.पाण्याचा गैरवापर झाल्यास, साठवण टाक्या भरून पाणी वाया गेल्यास, रस्त्यावर पाणी टाकल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाईचे तसेच नळजोड तोडण्याचेही आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. इमारत निरीक्षक, पेठ निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण निरीक्षक यांच्यावरही जबाबदारी सोपविली आहे. मात्र बांधकामांसाठी होणाऱ्या पाण्याच्या गैरवापरावर कमी कारवाई झाली आहे. केशवनगर, नगर रस्ता परिसर, सहकारनगर येथे नागरिकांना चार-चार दिवस पाणी मिळत नसल्याची तक्रारी आहेत. जुलै २०१६पर्यंत उपलब्ध पाणी वापराचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे आता पाणी गैरवापराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम उन्हाळ्यात नागरिकांना भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर सुरूच
By admin | Updated: November 2, 2015 01:14 IST