पुणे : “विद्यार्थ्यांना वरवरचे शिक्षण देऊन उपयोग नाही. बदलत्या काळानुसार तंत्राची सांगड घालणे आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील उंची गाठण्यासाठी अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियांवर संशोधन करणारी केंद्र शाळांमधून विकसित करण्याची गरज आहे,” असे मत प्राज इंडस्ट्रिजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण आणि पायाभूत सुविधा अद्ययावतीकरण आणि आंतरजाल निर्मिती उपक्रमाचा आरंभ डॉ. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शाळेचे माजी विद्यार्थी असणाऱ्या डॉ. चौधरी यांनी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतून स्थानिक क्षेत्र आंतरजुळणी (लॅन), भाषा प्रयोगशाळा निर्मिती, गणित प्रयोगशाळा निर्मिती, विज्ञान प्रयोगशाळा अद्यायवतीकरण आदी उपक्रमांचा आरंभ डॉ. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, शाळा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, डॉ. सविता केळकर आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले की, “कोरोनामध्ये शिक्षण ऑनलाईन आणि नोकरी-व्यवसायात वर्क फ्रॉम होम सुरू झाले. डिजिटल तंत्रज्ञानाशी सर्वांनीच जुळवून घेतले. तंत्रज्ञानाबरोबरच विचारांचे आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्यामुळे नावीन्य वाढवायला मदत होईल. पुढील वर्षी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्यामध्ये शाळेने जास्तीत जास्त योगदान द्यावे.” मुख्याध्यापक दिलीप रावडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुहास देशपांडे आणि चारुता प्रभूदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका अर्चना पंच यांनी आभार मानले.
चौकट
शाळेचे बोधचिन्ह
बोधचिन्हात उंच भरारी घेणारा गरुड पक्षी आहे. विविध वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रंगांचा बोधचिन्हात वापर करण्यात आला आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वे वर्ष ही ‘स्माइली’ वापरली आहे. शरद प्रभूदेसाई यांनी या बोधचिन्हाची निर्मिती केली आहे.