पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्लासरूम कॉम्पलेक्समध्ये अत्याधुनिक ‘ई - कंटेन्ट स्टुडिओ’ उभारण्यात आला असून या स्टुडिओच्या माध्यमातून विविध विषयावरील ई लेक्चर तयार केले जाणार आहेत. विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना या स्टुडीओचा वापर करून न्यूज चॅनेलवरील कामाचे प्रशिक्षणही दिले देता येणार आहे. परिणामी पुढील काळात विद्यापीठाला स्वत:चे आॅनलाईन न्यूज चॅनल चालविणेही शक्य होणार आहे.विद्यापीठाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) केंद्र शासनाकडे ‘कॉम्प्युटर सेंटर फॉअर ई- कंटेन्ट डेव्हलपमेंट’ या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. विद्यापीठाला रुसांतर्गत एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील ८५ लाख रुपये खर्च करून विद्यापीठाने अत्याधुनिक स्टुडिओ उभारला आहे. या स्टुडिओसाठी पीटूझेड कॅमेरे वापरण्यात आले आहेत. प्रथमत: सायबर क्राईम या विषयावरील ई- कंटेन्ट तयार केला जाईल. सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून ती सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट व मोबाईल अॅपवरही उपलब्ध करून दिली जातील. त्यानंतर विविध विषयांची व्याख्याने तयार केली जातील. गंभीर विषय सोप्या पद्धतीने समजून देण्यासाठी सर्व विद्याशाखांच्या प्राध्यापकांना या स्टुडिओचा वापर करता येईल.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, विद्यापीठात अत्याधुनिक स्टुडिओ असावा, असे मत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या स्टुडिओत आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. मास कम्युनिकेशन व पत्रकारितेचा अभ्यास करण्या-या विद्यार्थ्यांना हा स्टुडोओ उपलब्ध करून दिला जाईल. परिणामी विद्यापीठाचे विद्यार्थी एखादी शॉर्ट फिल्मही या स्टुडिओच्या सहाय्याने तयार करू शकतील. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचा ‘ई-कंटेन्ट’ स्टुडिओ
By admin | Updated: January 20, 2016 00:55 IST