पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणा-या प्रथम सत्राच्या परीक्षेस शुक्रवारपासून सुरळीतपणे सुरूवात झाली असली तरी परीक्षेच्या पहिल्या दिवशी काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. शुक्रवारी एकूण ७४ विषयांची परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेसाठी ९०.१४ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यापीठातर्फे पुणे अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये तब्बल ५ लाख ८० हजार अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु, सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा १० एप्रिल पासून सुरू होणार नव्हती. सर्व विषयांचे परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, ब-याच विद्यार्थ्यांनी वेळापत्रक नीट न पाहिल्यामुळे त्यांना सरसकट सर्वांची परीक्षा शुक्रवारपासून आहे, असे वाटले. त्यामुळे अनेकांनी याबाबत विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. हेल्पलाईनवर जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी संपर्क साधला.तर सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स वर विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
परीक्षा सुरू असताना बीसीएच्या अगदी काहीच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आली. पण ती पुढील अर्ध्या तासात सोडवून विद्यार्थ्यांना लगेच पुन्हा परीक्षेचा पर्याय दिला गेला.युजर आयडी- पासवर्ड न मिळणे.तसेच विषय न दिसणे, हॉलतिकीट डेटा व प्रत्यक्ष एलॉटमेंट यात तफावत आदी तक्रारी विद्यार्थ्यांनी नोंदवल्या.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली नाही त्यांना कॅमेरा सेट करण्यात काहीशा अडचणी आल्याचे जाणवले.
-----
पहिल्या दिवशी विद्यापीठाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
अपेक्षित विद्यार्थी - २८ हजार १३१
उपस्थित विद्यार्थी - २५ हजार ३५६
अनुपस्थित- २ हजार ७७५
टक्केवारी- ९०.१४
----