पुणे : राज्यातील अनेक ठिकाणांहून पुणे शहरात विद्यार्थिनी शिक्षणासाठी म्हणून येत असतात. त्यांची राहण्याची अडचण असते. त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी सांगितले. समाजातील शोषित, वंचित घटकांच्या पाल्यांना दर्जेदार शालेय शिक्षण, झोपडपट्टीतील नागरिकांना ५०० चौरस फुटांची घरे आदी विषयांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमहापौर म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर कांबळे यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे पदाधिकारी महेंद्र कांबळे, आपल्या संघर्षशील राजकीय जीवनाचा पट उलगडताना ते म्हणाले, ‘‘मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून लहान वयातच पुण्यात स्थलांतरित झालो. शेंगा विकून दिवस काढले, पण शिक्षण सोडले नाही. ते घेत असतानाच सामाजिक काम सुरू केले. नामदेव ढसाळ, रामदास आठवले यांच्यामुळे शोषित, वंचितांच्या न्याय हक्कांसाठी भांडण्याचे बळ मिळाले. दलित पॅँथर, नंतर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे काम करताना राजकारणाची ओळख झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सन १९९७ मध्ये पहिल्यांदा निवडून आले. सत्तापद गोरगरिबांसाठी वापरण्याचे व्रत कधीही सोडले नाही.’’ ‘‘पद समाजाने दिलेले आहे व ते समाजासाठीच वापरणार,’’ असे स्पष्ट करून कांबळे म्हणाले, ‘‘उपेक्षित समाजघटकाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका आहे. रिपाइंने विविध राजकीय पक्षांबरोबर युती, आघाडी केली; मात्र शब्द पाळण्याच्या बाबतीत भाजपा पक्का आहे हे मला मिळालेल्या पदावरूनच दिसते आहे. आमच्या गटाला स्वतंत्र मान्यता मिळाली नाही, मात्र सर्वसाधारण सभेत ठराव करून आम्ही गटनेता व महापालिकेत आमच्यासाठी स्वतंत्र कार्यालय मिळवू.’’ (प्रतिनिधी)
उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे
By admin | Updated: March 23, 2017 04:37 IST