पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात आता वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच, पोलिसांना आपल्या खासगी वाहनावर पोलीस विभागाचे चिन्ह वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे.दुचाकी व चारचाकी वाहने वापरणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा आणि सिटबेल्टचा वापर करावा अशा सूचना पोलीस आयुक्तालयातर्फे वेळोवेळी करण्यात आल्या आहेत. तरीही, शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाच्या दाराजवळ हेल्मेट न घालता आणि वाहन परवाना जवळ न बाळगता वाहन चालविल्याबद्दल शिपाई वैशाली सूळ यांना ७०० रुपये दंड करण्यात आला. सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या असून, वाहतूक शाखेने बेशिस्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी आणि त्याबाबतच्या नोंदी वाहतूक नियंत्रण कक्षात ठेवाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी खासगी वाहनावर पोलीस विभागाचे चिन्ह किंवा पोलीस या शब्दाचा वापर करू नये, असे परिपत्रक गेल्या वर्षी ७ सप्टेंबरच्या सुमारास काढण्यात आले होते. त्यानंतरही याचा वापर सुरूच असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बेशिस्त पोलिसांवर आता कारवाईचा बडगा
By admin | Updated: October 9, 2016 05:05 IST