शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या मंदिर परिसरात अस्ताव्यस्त होत असलेल्या बेकायदेशीर पार्किंगमुळे भाविकांना नाहक त्रास सहन करून मार्ग काढावा लागत आहे. बेकायदेशीररीत्या फोफावत चाललेल्या पार्किंगवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.प्रदक्षिणा मार्गावरून मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर महाद्वारात प्रवेशाच्याच वेळी भाविकांना येथील बेशिस्त पार्किंगचा सामना करावा लागत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रवेश मार्गावरच बहुसंख्य वाहने बेकायादेशीररीत्या पार्किंग केली जात असल्याने भाविकांना चालताना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मंदिरात प्रवेश करायचा कसा? असा प्रथमदर्शनी प्रश्न भाविकांना पडू लागला आहे. मंदिराबाहेरील मोकळ्या परिसरात ‘नो -पार्किंग’चा फलक लावण्यात आला असतानाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे मंदिराचा श्वास कोंडला जाऊन परिसरात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. त्यातच दुकानदार, प्रसाद विक्रेते, फेरीवाले आदींचे अतिक्रमण अधिक भर घालत आहे. त्यामुळे शेजारील रस्त्यावरून पायी ये-जा करतानाही अडचण होत आहे. बेकायदेशीरपणे ‘नो-पार्किंग’ झोनमध्ये वाहने लावलेल्या महाशयांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व भाविकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
अलंकापुरीत अनधिकृत पार्किंग
By admin | Updated: January 25, 2017 01:26 IST