भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. परिवारासह देवदर्शनासाठी जात असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथील बाजार समितीच्या गेटसमोर उभा असलेल्या ट्रकला मोटारीने मागील बाजूने ठोकर दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी २ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर ७ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. २४) सकाळी ७ च्या सुमारास घडली. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : या अपघातात लावण्या चंद्रकांत कुदळे (वय २) या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हवेली तालुक्यातील लोणकरवाडी येथील जालिंदर शिवरकर, चंद्रकांत कुदळे, बापू कापरे हे तिघे आपल्या कुटुंबीयांना घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूरला निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल ज्योती येथे नो-पार्किंग झोनमध्ये उभा असलेला मालवाहतूक ट्रक (केए ५६/ ०६५७) या ट्रकला सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो (एमएच १२ एमव्ही १५४४) या मोटारीची पाठीमागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये सचिन कानिफनाथ शिवरकर (वय ३७), नलिनी सचिन शिवरकर (वय, ३२), मुलगा अथर्व सचिन शिवरकर (वय १२, सर्व रा. टिळेकरवस्ती, लोणकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), अमोल प्रभाकर कापरे (वय २३), रोहिणी अनिल कापरे (वय ३८), स्वाती चंद्रकांत कुदळे (वय २७, वरील सर्व रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) जखमी झाले. लावण्या कुदळे या चिमुकलीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना लावण्याचा मृत्यू झाला. हा अपघात महामार्ग पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे घडला असल्याचे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांनी सांगितले. नो-पार्किंगच्या ठिकाणी मालगाड्या उभ्या केल्याने बरेचसे अपघात होऊनही महामार्ग पोलिसांना जाग येत नाही. त्यामुळेच आजचा अपघात होऊन चिमुरडीचा जीव गेला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात जालिंदर काशिनाथ शिवरकर (रा. टिळेकरवाडी, लोणकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक अशोक रेड्डी, गुंडा रेडी चामले (वय ५०, रा. बसवल्याण सस्तापूर, जि. बिदर, राज्य कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भानुदास पवार, विलास मोरे, हवालदार अनिल सातपुते, श्रीरंग शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)
दोन वर्षांच्या चिमुरडीचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: January 25, 2017 01:44 IST