पिंपरी : पुण्यातील साधू वासवानी चौकात असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी दुपारी ४च्या सुमारास रंगेहाथ पकडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सुशील शर्मा आणि सचिन कुमार हे दोन अधिकारी या कारवाईत अडकल्याची चर्चा आहे. अहमदनगरमधील एका व्यावसायिकाने प्राप्तिकर विभागातील कामासाठी या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ते काम करून देण्यासाठी या व्यावसायिकाकडे त्यांनी ५० हजार रुपये लाच मागितली. त्याबाबत संबंधित व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार केली. तिची दखल घेऊन सीबीआयच्या पथकाने सापळा रचला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यालय, तसेच घराची झडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तपासकार्य सुरू होते. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
दोन प्राप्तिकर अधिकारी लाचप्रकरणी ताब्यात
By admin | Updated: September 22, 2015 03:06 IST