लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : जेजुरीनजीक असलेल्या नाझरे जलाशयातून सध्याच्या दुष्काळी व टंचाईकाळात दिवसा व रात्री अनधिकृतपणे पाणीउपसा होत असून, पाणी उपसणाऱ्या व्यक्तींवर ठोस कारवाई करण्याची मागणी करीत पिंपरी येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी नाझरे पाटबंधारे कार्यालयासमोर बुधवारपासून (दि. १०) उपोषणाला सुरुवात केली होती. आमच्या विरोधातील आंदोलन राजकीय हेतूने व वैयक्तिक आकसापोटी होत असल्याचा आरोप करीत रानमळा ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता महादेव शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली तानाजी कुंडलिक हंबीर, रोहिदास हंबीर, राजेश अशोक छाजेड, बापू लक्षमण शेंडकर, हरिश्चंद्र जानबा थेऊरकर, ज्ञानदेव शेंडकर आदींसह सुमारे ३० ते ३५ शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. नाझरे जलाशयातून वीजतारेवर आकडे टाकून अथवा जनरेटर , टॅक्टर जनरेटर, पाणबुडी मोटरद्वारे दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा होत आहे. उन्हाळ्याच्या व दुष्काळी परिस्थितीमध्ये याच जलाशयावर टँकर भरले जातात. पिण्यासाठी पाणी राखीव असतानाही पाणी उपसण्याचा प्रकार होत असून, संबंधित पाणी उपसा करणाऱ्या व्यक्तींवर ठोस व कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.दरम्यान, जलाशयात असलेल्या डबक्यातील पाइपलाइन हलविण्याचे काम बुधवारी (दि.१० ) सकाळपासून सुरु असल्याचे दिसून आले.
नाझरे धरणातील अनधिकृत पाणीउपसा बंद करा
By admin | Updated: May 11, 2017 04:07 IST