निगडी : शहरातील काही नामांकित शाळा, महाविद्यालयासंह उपनगर परिसरातील शाळा, महाविद्यालयांत टवाळखोर मुले बिनधास्त प्रवेश करून आजूबाजूच्या परिसरात गोंधळ घालत आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयामधील शैक्षणिक वातावरण बिघडत आहे. टवाळखोरांमुळे शहरात एखादा अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. शाळा महाविद्यालयासाठी हे टवाळखोर डोकेदुखी ठरत असून, त्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. टवाळखोर मुले शुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांना दमदाटी करतात. आशा प्रकारामुळे विद्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. काही टवाळखोर महाविद्यालय भरताना व सुटण्याच्या सुमारास प्रचंड वेगात दुचाकी चालवून कर्कश हॉर्न वाजवतात. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी धांदल उडते. यामुळे अपघाताचे प्रकारही घडतात. तर काही टवाळखोर दुचाकीवरुन येऊन मुलींची छेड काढतात. पोलिसांनी महाविद्यालय परिसरात गस्त वाढवली तर टवाळखोरांचा उपद्रव थांबू शकतो. टवाळखोरांची प्रंचड दहशत असल्याने अनेकदा विद्यार्थी त्रास सहन करणे पसंत करतात. काही महाविद्यालयीन सुरक्षारक्षक नावापुरते शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक दिसतात. पंरतु हे सुरक्षारक्षक शाळेत, महाविद्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या अनोळखी व्यक्तींची चौकशी करीत नाहीत, याचाच फायदा हे टवाळखोर घेतात. महाविद्यालयामध्ये गोंधळ घालतात. यामुळे सुरक्षारक्षकांना वेळीच सूचना देऊन महाविद्यालयीन सुरक्षा कडक करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. याबाबत प्रशासनाने शाळेच्या आवारात तक्रार पेट्या बसविल्या आहेत. परंतु त्यामध्ये तक्रार करण्याकडे विद्यार्थिनींचा कल कमी आहे. त्यामुळे तक्रारपेट्या धूळ खात पडल्या असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)उद्यान : असुरक्षिततेचे वातावरणनिगडी प्राधिकरणातील अनेक उद्यानांमध्ये टवाळखोर वावरत असतात. त्यांना कोणाचेही भय उरले नाही. त्यांच्या त्रासाने अनेक नागरिकांनी उद्यानामध्ये सकाळी फिरण्यास येणे बंद केले आहे, तर उद्यानातील सुरक्षारक्षक हे जागेवर हजर नसतात. त्याचाच फायदा टवाळखोर मुले उचलतात. मोठ्याने ओरडणे, उद्यानात गोंधळ घालणे असे प्रकार घडत आहेत. ही मुले महाविद्यालयाच्या गणवेशामध्ये असतात. त्यांना महाविद्यालयातून बाहेर का सोडण्यात येते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना महाविद्यालय सुटेपर्यंत उद्यानाच्या बाहेर सोडू नये, अशी मागणी होत आहे. परंतु त्याकडे शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु पोलीसही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नसल्याने टवाळखोरांच्या खोड्या वाढत चालल्या असल्याचे चित्र दिसत आहे.
टवाळखोरांचा त्रास
By admin | Updated: January 10, 2017 03:15 IST