घोडेगाव : भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतत असताना हिंगोली जिल्ह्यातील ७० वारकऱ्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात होऊन यामध्ये ४१ जण जखमी झाले. गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून पोखरी घाटातील अवघड वळणावर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. आळंदीतून माऊलींची पालखी निघण्यापूर्वी विदर्भ, मराठवाडा येथून आलेले अनेक वारकरी भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत असतात. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महागाव, पिंपराळा, खांडेगाव, टेंभुर्णी, वडताळा येथील हे ७० वारकरी नाशिक त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन भीमाशंकरकडे आले होते. आज दि. ६ रोजी पहाटे दर्शन घेऊन आळंदीकडे जात असताना मंचर- भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील कळमजाई मंदिराजवळ अवघड वळणावर सकाळी ९.१५ च्या सुमारास अपघात झाला. अपघात झाल्याचे दिसताच सोमनाथ गेंगजे व मापोली ग्रामस्थांनी तत्काळ मदत करण्यास सुरुवात कली. डिंभे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव पोलीस ठाण्यासही कळविले. तात्काळ पोलीस व घोडेगाव, मंचर येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन सर्व जखमींची विचारपूस केली. तसेच वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर व जयप्रकाश मुंदडा यांना दूरध्वनी करून अपघाताची माहिती दिली .त्यांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे़ आमदार नीलम गोऱ्हे यांनी दुपारी अपघातग्रस्तांची भेट घेतली. (वार्ताहर)
पोखरी घाटात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात
By admin | Updated: July 7, 2015 03:18 IST