पुणे : दर वर्षी काही लाख वाहनांची भर पडणार्या या शहरात वाहतुकीच्या नियोजनामध्ये मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली आहे. त्यामुळे शहराच्या सर्व भागांत वाहतूककोंडी व त्यातून होणारे ध्वनिप्रदूषण याची सातत्याने भर पडत आहे़ वाहतुकीच्या या खेळखंडोबाला सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर दिसणार्या वाहतूक पोलीस आणि त्यांच्या शाखेला दोष देत असतात़ प्रत्यक्षात रस्त्यावर असलेल्या मर्यादित सोयीसुविधांचा वापर करून वाहतूक सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असतो़ पुण्यासारख्या महानगरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती आणि प्रशिक्षित वाहतूक अभियंता (ट्रॅफिक इंजिनिअर) आमच्याकडे नाही, असे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे़ महापालिकेकडे या सर्व सुविधा आहेत, पण त्यांच्याकडून आवश्यक तेवढा प्रतिसाद नसल्याचे सांगितले जाते़ पुणे शहरातील सर्वांत जास्त वाहतूककोंडी होणारे साधारण १६ चौक वाहतूक शाखेने निश्चित केले असून, तेथे वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबतची माहिती वाहतूक शाखेने महापालिकेच्या वाहतूक नियोजन शाखेकडे दिली आहे़ पोलिसांनी केलेल्या अभ्यासानुसार, तेथे काय बदल करता येईल, याची माहिती महापालिकेच्या वाहतूक नियोजन शाखेकडे पाठविण्यात आली होती़ त्यावर वाहतूक नियोजन विभागाचे काय म्हणणे आहे़ पोलिसांनी केलेल्या अभ्यासानुसार उपाययोजना केल्या, तर त्या चौकातील वाहतूककोंडी कमी होण्याची शक्यता आहे का, की त्या चौकातील वाहतूककोंडी कमी होत असतानाच त्यामुळे दुसर्या चौकात काही नवीन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे का असे अनेक प्रश्न असतात़ त्याचा महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने शास्त्रशुद्ध अभ्यास करून उपाययोजना करण्याची आवश्यकता असते़ पण, वाहतूक नियोजन विभागाकडून त्यादृष्टीने काहीही अभ्यास होत नाही़ वाहतूक शाखेने आपल्या परीने तयार केलेल्या उपाययोजना योग्य आहेत की नाही, हे कळविले जात नाही आणि समन्वय समितीच्या बैठकीत त्याचा आग्रह धरला, तर उपाययोजना सुरू केल्या जातात; पण त्या पूर्ण होतीलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही, असे वाहतूक शाखेचे म्हणणे आहे़
वाहतूक शाखेला मिळेना ट्रॅफिक इंजिनिअर
By admin | Updated: May 25, 2014 04:42 IST