नारायणगाव : छेडछाड केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली़मोहक स्वानंद वाजगे (वय २२, रा. वाजगेआळी नारायणगाव) आणि त्याचा साथीदार अक्षय गायकवाड ऊर्फ डोरेमॉन (रा़ पेठ आळी, नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून मोहक यास अटक केली आहे़ यासंदर्भात फिर्यादी वैभव प्रकाश वर्पे (रा़ वारुळवाडी) यांनी रविवार (दि. २१) नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ मोहक वाजगे व त्याचा मित्र अक्षय गायकवाड हे दोघे आपल्या मोटारसायकलवरून कॉलेज रस्त्यावर १६ वर्षीय मुलीस अनेक दिवसांपासून छेडछाड करून त्रास देत आहेत. तिचा पाठलाग करून तिच्याकडे बघून वाईट इशारे करणे, मोटारसायकलवरून जाणीवपूर्वक धक्का मारून तिला अश्लील शब्द प्रयोग करणे, अशा प्रकारे त्रास देत होते. त्यामुळे या विद्यार्थिनीने या दोघांच्या त्रासाला कंटाळून रविवार (दि.२१) सायंकाळी ७.३० वा़ च्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ कुटुंबियांनी तिला उपचारासाठी नारायणगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी मोहक वाजगे याला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड हे करीत आहेत़ (वार्ताहर)
छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने घेतले विष
By admin | Updated: February 23, 2016 03:19 IST