वाठार (ता. भोर) येथील समाधी संवर्धन व स्वच्छता अभियान ग्रामस्थ मंडळ आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मोहिमेस सकाळी सात वाजता सुरुवात करण्यात आली. समाधिस्थळी मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे, गवत वाढले होते. प्रथम ते साफ केले
साफसफाई करताना प्रथम पाहण्यात एकच समाधी आली होती, परंतु स्वच्छता अभियानास सुरुवात केल्यावर एक नसून दोन समाध्या असल्याचे निदर्शनास आले. त्यातील दुसऱ्या समाधीची अवस्था खूपच वाईट होती. समाधी पूर्ण तुटून तीन भागांमध्ये अस्ताव्यस्त पडलेली होती, त्यातील एक भाग अर्धा जमिनीत गाडलेला होता. सर्व लोकांच्या मदतीने तो भाग जमिनीच्या वर काढून समाधीचे सर्व भाग तात्पुरत्या स्वरूपात एकत्र जुळवले. त्यानंतर समाध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व त्याची पाहणी केल्यावर दोन्ही समाध्यांवरती शिवपिंडी असल्याचे निदर्शनास आले. यावरून प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही समाध्या या वीरांच्या असल्याचे दिसले.
दरम्यान, यावर ग्रामस्थ मंडळ वाठार हिमा यांच्याशी सदर समाध्यांवर चर्चा केल्यानंतर कळाले की या ठिकाणी पुरातन भैरवनाथ मंदिर होते व समोरच गावठाण होते.
नंतरच्या काळात गाव विस्थापित झाले, परंतु समाध्यामुळे जागा तशाच सोडल्या होत्या. नंतरच्या काळात समाध्या ग्रामस्थांच्या विस्मरणात गेल्या होत्या. आज आम्ही ग्रामस्थांना सदर समाध्यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी लवकरच ग्रामस्थांचे जीर्णोद्धार करण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर सदर जागेच्या पुढील बाजूने खाली नदीकडे गेल्यावर डाव्या बाजूला एक शिवमंदिर आहे. त्यासमोर काही वीरगळी व इतर मूर्ती आहेत, त्यांचेही जीर्णोद्धाराचे कार्य आम्ही पुढील काळात करणार असल्याचे संदीप खाटपे यांनी सांगितले.
सदर स्वच्छता मोहिमेसाठी वाठार गावचे सरपंच संदीप खाटपे, ज्ञानोबा खाटपे, शिवव्याख्याते संदीप खाटपे, पंडित खाटपे, लक्ष्मण खाटपे, सुभाष खाटपे, विष्णू खाटपे, सचिन खाटपे, शंकर खाटपे, सागर खाटपे, विकास खाटपे, मारुती खाटपे, दिशा खाटपे, सुनील चिकने, दीपक नवघणे उपस्थित होते.
---
०३ भोर : वाठार पूर्वजांच्या समाध्यांची स्वच्छता
वाठार हिमा येथील पुर्वजांच्या समाध्या साफ सफाई करताना कार्यकर्ते