पाटस : येथील टोल नाक्यावर टोलवरून वाहनचालकाने कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादावरून भाडोत्री गुंडाना बोलावून टोलनाक्यावर सशस्त्र हल्ला करुन दगडफेक केली. तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात टोलचे नुकसान झाले असून दोन कर्मचारी जखमी झाले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुण्याच्या दिशेने छोटी चारचाकी गाडी आली. या वेळी टोल देण्याच्या कारणावरुन गाडीतील काही व्यक्तींनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. या वेळी गाडीतील प्रवाशी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. मात्र तो मिटल्यानंतर ती गाडी भिगवणला गेली. मात्र, ही गाडी पुन्हा टोलनाक्यावर आली. त्यावेळी तेथे त्यांच्यासमवेत ५0 ते ६0 गावगुंड हॉकीसह अन्य शस्त्रे घेऊन आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अचानक केलेल्या हल्ल्याने कर्मचारी जीवमुठीत घेऊन सैरावैरा पळत होते. जमावातील काही लोकांनी टोलनाक्यावर दगडफेक केल्याने टोलनाक्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच एका दुचाकीवर दगडफेक करुन या दुचाकीचे नुकसान करुन सर्व जण पळून गेले. घटनास्थळी दौंड आणि यवतच्या पोलिसांनी पाहणी केली. मात्र टोलनाक्यातील कुठलाही जबाबदार अधिकारी या घटनेच्या वेळी टोलनाक्यात उपस्थित नसल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांनी कुठलाही गुन्हा नोंद केली नव्हता. पाटस टोलनाक्याचे व्यवस्थापक उत्तम सिंह म्हणाले, झालेल्या मारहाणीत आमचे दोन कर्मचारी जखमी झाले असून सदरची घटना दुर्दैवी आहे. (वार्ताहर)
टोलवर दगडफेक
By admin | Updated: June 8, 2015 05:16 IST