पुणे : वाचकांनी भरभरून दिलेल्या पाठबळावर ‘लोकमत’ वृत्तपत्राने पुण्यात १५ वर्षे पूर्ण करून १६व्या वर्षात पदार्पण केले आहे़ हेच प्रेम वृद्धिंगत करण्याचे निमित्त साधण्यासाठी रविवारी (दि़ २८) सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे़गेल्या १५ वर्षांत पुणेकरांच्या पाठबळावर ‘लोकमत’ची पुण्यात दमदार वाटचाल सुरू आहे. पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा- आकांक्षा पूर्ण केल्या. गणेशाची हजारो चित्रे रेखाटून पुण्याच्या गणेशोत्सवाला विश्वविक्रमी केले. ‘ती’चा गणपतीसारखे अभिनव उपक्रम राबविले. वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ याचे भान ठेवून साहित्य, संस्कृती, कला अन् विद्येच्या या माहेरघरात या परंपरेला साजेशी भूमिका घेतल्यानेच पुणे शहरात ‘लोकमत’ रुजला़ प्रगतीची गरुडभरारी घेत, ऋणानुबंधांच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे़ ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी केले आहे़