पुणे : समान पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली असली तरी या योजनेसाठी लागणारा सुमारे २८०० कोटी रुपयांचा निधी उभा करताना महापालिकेच्या नाकीनऊ येणार आहे. हा निधी गोळा करताना पालिकेला मोठी कसरत करावी लागणार असल्याने या योजनेची सुरुवात सध्यातरी अधांतरीच असल्याचे चित्र आहे.पाणी वाटपातील असमानता दूर करून शहराला २४ तास समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या २ हजार ८१८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्य सभेने नुकतीच मान्यता दिली आहे. शहराची २०४७ची लोकसंख्या गृहीत धरून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शहरात ३ लाख पाणीमीटर बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च आराखड्यातच मांडण्यात आला आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी पालिकेला पहिल्यांदा मीटर बसवावे लागणार आहेत. समान पाणीपुरवठा योजनेला ‘जेएनएनयूआरएम’ योजनेतून निधी मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र, ही योजना बंद करण्यात आल्याने स्मार्ट सिटी योजनेतून काही निधी मिळविला जाणार आहे. (प्रतिनिधी)सुमारे ४ हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे जाळे निर्माण करावे लागणार आहे. या कामांसाठी सुरुवातीपासूनच मोठा निधी लागणार आहे. मात्र, सध्या पालिका प्रशासनाकडे हा निधी मिळविण्यासाठी कुठलाही ठोस आराखडा नाही. त्यामुळे सध्यातरी ही योजना काही वर्षे कागदावरच राहील, असे दिसते.