खोडद : विषारी सर्पाने दंश केल्यानंतर काही वेळातच ती महिला पूर्णपणे बेशुद्ध झाली. श्वासोच्छ्वास, रक्तदाब व हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद पडले. या महिलेला अत्यंत विषारी अशा नागाने दंश केल्याने व तिची झालेली अवस्था पाहून तिच्या जगण्याची आशा सोडली होती. केवळ प्रयत्न म्हणून त्या महिलेला मृत झाली असे समजून नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणून एका बेडवर टाकली. आता फक्त डॉक्टर तिला तपासतील आणि तिला मृत घोषित करतील, असा विचार करत नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर थांबले होते. पण डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न करून या महिलेचा जीव वाचविण्यात यश मिळविले.
मृत झाली असे समजून तिच्या जगण्याची आशा सोडलेल्या नातेवाईकांनी डॉ. राऊत यांच्या रूपाने देवदूत भेटल्याची भावना व्यक्त केली. काळ आला होता पण डॉ. राऊत यांनी आपल्या अथक प्रयत्नानंतर या महिलेच्या मृत्यूची वेळ थांबवली होती, जणू याचीच प्रचिती या महिलेच्या नातेवाईकांना आली.
याबाबत माहिती अशी की, अलकाबाई पांडुरंग भोर (वय ६५, रा. आभाळवाडी, अकलापूर, ता. संगमनेर) ही महिला गुरुवारी, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. शेतातून घरी येत असताना तिच्या डाव्या पायाला विषारी सर्पाने तीव्र दंश केला. जवळ असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी धाव घेऊन दंश करणाऱ्या सर्पाला मारले. त्या सर्पाला मारल्यानंतर तो सात फुटी अत्यंत विषारी नाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्पदंशानंतर महिलेची झालेली अवस्था पाहून ती मृत झाली असावी पण शेवटचा एक प्रयत्न म्हणून नातेवाईकांनी आभाळवाडी ते नारायणगाव हे ५० किलोमीटरचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत पार करून या महिलेला त्वरित जीपमधून नारायणगाव येथे डॉ. राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तिला मृत समजून नातेवाईकांनी अतिदक्षता विभागातील एका बेडवर या महिलेला टाकले. डॉ. राऊत व त्यांच्या टीमने प्राथमिक तपासण्या केल्या असता तिचा रक्तदाब लागत नव्हता. श्वासोच्छ्वास बंद होता, हृदयाचे ठोके लागत नव्हते.
डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी तत्काळ या महिलेला व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छ्वास व इतर तातडीचे उपचार सुरू केले. महिलेच्या छातीवर मसाज दिला. सर्पदंशावरील लसीचे २० इंजेक्शन दिले. डॉ. राऊत दीड तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नाडीचे ठोके लागू लागले.
१२ तासानंतर डोळे उघडले, ३६ तासानंतर पूर्णपणे शुद्धीवर आली.
"आपल्या परिसरात कोणालाही सर्पदंश झाल्यास सदर रुग्णास जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. मंत्र-तंत्र करून विषबाधा उतरविण्याचा प्रयत्न करू नये. यात वेळ वाया जाऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी एक एक मिनिट हा लाख मोलाचा असतो."
- डॉ. सदानंद राऊत, नारायणगाव
सदस्य, जागतिक आरोग्य संघटना
सर्पदंश तज्ज्ञ समिती